राजस्थानच्या बिकानेरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका जिममध्ये पावरलिफ्टींगचा सराव करताना राष्ट्रीय स्तरावरील महिला खेळाडू यष्टिका आचार्य हिचा मृत्यू झाला आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, तो पाहणारे धक्क्यात आहेत.
जिममध्ये एका दांड्याला दोन्ही बाजुंना एकूण २७० किलोचे वजन लावलेले होते. ते तिने खांद्यावर उचलले होते. तिला सपोर्ट देण्यासाठी ट्रेनरही होता. परंतू ती अचानक वजनाने खाली बसली आणि तिच्या मानेवर वजनाचा भार आला व तिचा मृत्यू झाला.
यष्टिका ही १७ वर्षे वयाची होती. यष्टिकाच्या बाबत एक मोठी चूक झाली. पावर लिफ्टिंगच्या वेळी खेळाडूच्या जवळ तिघे जण असावेत असा आंतरराष्ट्रीय नियम आहे. दोन बाजुला दोघे आणि मागे सपोर्ट देण्यासाठी एक असे तिघांची रचना असते. खेळाडूला वजन उचलताना हे लोक मदत करतात. वजन उचलल्यानंतर एकदा का खेळाडू स्थिर झाला की मागचा व्यक्ती वजनाला लावलेला हात सोडतो व मागे जातो. बाजुचे दोन तसेच बाजुला उभे असतात. यष्टिकाच्या वेळेला एकानेच तिला सपोर्ट दिला होता. यामुळे तिच्यावर भार पडला व तोल गेला, असा अंदाज वरिष्ठ खेळाडूंनी लावला आहे.
एकंदरीतच या घटनेचा व्हिडीओ भयावह आहे. तिने वजन मागे न टाकता मानेवरच घेतले, यामुळे तिला या संकटाला सामोरे जावे लागल्याचे इंटरनॅशनल पावर लिफ्टर निधि सिंह पटेल यांनी म्हटले आहे. यावर आता पॉवर लिफ्टर खेळाडू, प्रशिक्षकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
सामान्य जिममध्येही हे केले जाते...यष्टिका ही खेळाडू होती, यामुळे ती याचा सराव करत होती. परंतू, सामान्य जिमममध्ये देखील व्यायाम म्हणून वजन उचलले जातात. यावेळी कोच किंवा सोबत व्यायाम करणारे लोक असतात. यावेळी पुरेशी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.