मेलबोर्न : गत वर्ल्डकपच्या तुलनेत सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत अधिक परिपक्व झालो आहे, असे मत टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज सुरेश रैना याने व्यक्त केले आहे़रैना सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे़ वर्ल्डकपच्या साखळी फेरीत त्याने झिम्बाब्वेविरुद्ध शानदार शतकी खेळी केली होती, तर पाकविरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीतही त्याने अर्धशतकी खेळी करून संघाच्या विजयात योगदान दिले होते़ बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीपूर्वी रैना म्हणाला, की २०११ च्या तुलनेत आता मी एक खेळाडू म्हणून अधिक परिपक्व झालो आहे़ मी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, युवराज सिंह, मोहंमद कैफ या अनुभवी खेळाडूंकडून खूप काही शिकलो आहे़ विशेष म्हणजे मी गरज पडेल तेव्हा चौथ्या, पाचव्या, सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे़ त्यामुळे कोणत्या परिस्थितीत कसा खेळ करायचा, याचे कसब अवगत केले आहे़ हा स्टार फलंदाज पुढे म्हणाला, की वर्ल्डकपमध्ये भारतीय खेळाडू आपापली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडत आहेत, याचा आनंद आहे़ फलंदाज उत्कृष्ट कामगिरी करीत आहेत, तर गोलंदाजसुद्धा विशेष योगदान देत आहेत़ सांघिक कामगिरीच्या बळावर भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे़ बांगलादेशविरुद्धसुद्धा आम्ही कामगिरीत सातत्य राखू़ गत सहा सामन्यांत आम्ही ६० विकेट मिळविल्या आहेत़ त्यामुळे गोलंदाजांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे़ वर्ल्डकपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत गोलंदाजांनी अशीच कामगिरी केली, तर आम्ही कुणालाही पराभूत करू शकतो, असेही रैनाने सांगितले़ (वृत्तसंस्था)