Nitin Gadkari congratulated Divya Deshmukh: नागपूरच्या अवघ्या १९ वर्षांच्या दिव्या देशमुख हिने जॉर्जियातील बटुमी येथे खेळल्या गेलेल्या Women's Chess World Cup Final मध्ये ३८ वर्षांच्या ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला (Koneru Humpy) पराभूत केले. दोन्ही खेळाडूंमधील सुरूवातीचे सामने अनिर्णित राहिले होते. त्यानंतर आज, सोमवारी रॅपिड राऊंड्स खेळवण्यात आल्या. त्यात दिव्याने विजयश्री मिळवली. या विजयानंतर, नागपूरच्या लेकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडीओ कॉल करून शुभेच्छा दिल्या.
नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिव्याशी व्हिडीओ कॉलने संपर्क साधला. त्यावेळी ते म्हणाले, "दिव्या, तुझं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. तुझा सर्वांना खूप अभिमान आहे. वेल डन! देवाची तुझ्यावर सदैव कृपा राहूदे." त्यावर दिव्याने स्मितहास्य करत, शुभेच्छांचा स्वीकार केला. त्यानंतर त्यांच्यात आणखीही थोडा गप्पा रंगल्या. पाहा त्या व्हिडीओ कॉलमध्ये काय घडले, पाहा व्हिडीओ-
दिव्याने 'असा' मिळवला विजय
दिव्या आणि हम्पी दोघींनीही चिनी खेळाडूंना पराभूत करून अंतिम सामन्यात धडक मारली होती. दोन्ही खेळाडूंमधील सुरुवातीचे सामने अनिर्णित राहिले. शनिवार आणि रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने (Koneru Humpy) नवीन बुद्धिबळ स्टार दिव्या देशमुखला आघाडी मिळवू दिली नाही. त्यामुळे मूळ सामना १-१ गुणांनी बरोबरीत राहिला. आज, सोमवारी खेळल्या गेलेल्या रॅपिड राउंडमध्ये जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानी असलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुख हिने पहिल्या गेममध्ये पांढऱ्या सोंगट्यांसह सुरुवात केली. आक्रमक खेळ करत तिने जागतिक क्रमवारीत ५व्या स्थानी असलेल्या कोनेरू हम्पीशी आधी बरोबरी साधली. मग रॅपिड राउंडच्या दुसऱ्या गेममध्ये काळ्या सोंगट्यांसह खेळताना दिव्याने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले आणि कोनेरूला पराभवाची धूळ चारली.