ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. ३ - पार्थिव पटेल व लैंडल सिमोन्सची तडाखेबाज फलंदाजी व लासिथ व हरभजनच्या अचूक मा-याच्या आधारे मुंबई इंडियन्सने यंदाच्या पर्वात विजयाची हॅट्ट्रीक साधली आहे. मुंबईने किंग्स इलेव्हन पंजाबचा २३ धावांनी पराभव केला आहे. शतकी सलामीनंतरही शेवटच्या षटकांमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजाच्या अचूक मा-याने मुंबई इंडियन्सला २० षटकांमध्ये १७२ धावाच करता आल्या. पार्थिवने ३९ चेंडूत ५९ तर सिमेन्सने ५६ चेंडूत ७१ धावांची खेळी केली.
रविवारी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब हे संघ आमने सामने आहेत. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईचे सलामीवीर पार्थिव व सिमेन्सने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. या जोडीने १०.४ षटकांमध्ये संघाला १०० धावा करुन दिल्या. मुंबईच्या १११ धावा झाल्या असताना पंजाबचा गोलंदाज करणवीर सिंहने पार्थिव पटेलला बाद करुन संघाला पहिले यश मिळवून दिले. यानंतर रोहित शर्मा २० चेंडूत २६ धावा करुन माघारी परतला. तर सिमोन्स ७१ धावांवर बाद झाला. शेवटच्या ५ षटकांमध्ये मुंबईला फक्त ३६ धावाच करता आल्या. मिशेल जॉन्सन, अनुरित सिंग व करणवीर सिंह या तिघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
आयपीएलमधील आव्हान टिकवण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या पंजाबची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. विरेंद्र सेहवाग, ग्लॅन मॅक्सवेल हे आघाडीचे फलंदाजी स्वस्तात बाद झाले.सलामीवीर मुरली विजय (३९ धावा) व डेव्हिड मिलर (४३ धावा) या दोघांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रत्न केला. विजय बाद झाल्यावर मिलरने जॉर्ज बेलीच्या मदतीने डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी अचूक व भेदक मारा करत दोघांनाही फटकेबाजी करण्याची संधीच दिली नाही. मिलर बाद झाल्यावर बेली, अक्षर पटेल, रिद्दिमान सहा हे फलंदाजही स्वस्तात बाद झाल्याने पंजाबला २० २० षटकांत ५ गडी गमावत १४९ धावाच करता आल्या.