By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 18:52 IST
विजयी कामगिरी तात्काळ सोशल मीडियावर टाकता येत नसल्याने नितेंद्रसिंग निराश
मुंबई मॅरेथॉन : पदक मिळवलं, पण मोबाईल गेला!
रोहित नाईक, मुंबई : सेनादलाच्या नितेंद्रसिंग रावत याने मुख्य मॅरेथॉनमध्ये भारतीय पुरुष गटात सुवर्ण पटकावले. यासह त्याने ५ लाख रुपयांच्या रोख पुरस्कारावरही कब्जा केला. मात्र यानंतरही तो काहीसा निराश होता, कारण स्पर्धेदरम्यान त्याचा मोबाईलच गहाळ झाला. यामुळे सोशल मीडियावर कायम ‘अॅक्टिव्ह’ असणाºया नितेंद्रसिंगला आपल्या विजयाची पोस्ट टाकता येत नव्हती आणि हेच त्याच्या निराशामागचे मुख्य कारण होते. गेल्या काही स्पर्धांमध्ये खालावलेल्या कामगिरीमुळे नितेंद्रसिंगवर अनेकांनी टीकेचा भडिमार केला होता. यासाठीच मुंबई मॅरेथॉनच्या दोन दिवसआधी त्याने सोशल मीडियावर ‘आता वेळ सिद्ध करण्याची आहे’ असे म्हटले होते. मात्र मॅरेथॉनदरम्यानच मोबाईल गहाळ झाल्याने आपल्या विजयी कामगिरीची माहिती सोशल मीडियावर टाकता न आल्याने सुवर्ण पटकावल्यानंतरही नितेंदरच्या चेहºयार निराशा पसरली होती.
‘मॅरेथॉनदरम्यान मोबाईल प्रशिक्षकांकडे दिला असताना तो कुठेतरी गहाळ झाला,’ अशी माहिती नितेंद्रने दिली. मोबाईल शोधण्याचा खूप प्रयत्नही झाला पण काही उपयोग नाही झाला, असेही त्याने निराशेने म्हटले. याविषयी नितेंद्रने अधिक सांगितले की, ‘ मला माझ्या वेळेत सुधारणा करायची होती. माझ्या खालावलेल्या कामगिरीमुळे अनेकांनी माझ्यावर टीका केली होती, त्यांना मला चोख उत्तर द्यायचे होते. यासाठीच मी मुंबई मॅरेथॉनआधी फेसबुकवर ‘आता वेळ सिद्ध करण्याची आहे’ असे म्हटले होते. पण दुर्दैवाने माझा मोबाईल हरवल्याने मी जिंकल्यानंतरही फेसबुकवर पोस्ट टाकलू शकलो नाही. मला मोबाईल गेल्याचे दु:ख नसून सोशल मीडियावर अद्याप मी माझे अपडेट टाकू शकत नाही, याचे दु:ख जास्त आहे.’त्याचप्रमाणे, ‘या विजेतेपदानंतर माझ्या टीकाकारांना नक्कीच चोख उत्तर मिळाले असणार. मी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असतो. त्यामुळेच अजून पोस्ट टाकता न आल्याने निराश आहे. पण लवकरंच माझी पोस्ट अपलोड होईल. आता मी दुसºया फोनचा वापर करेन, पण त्यासाठी मला सर्व अॅप पुन्हा डाऊनलोड करावे लागतील.’ असेही नितेंद्रने म्हटले. पुढील योजनांविषयी नितेंद्र म्हणाला की, ‘ आता मी २९ एप्रिलला होणाºया लंडन मॅरेथॉनसाठी तयारी करणार आहे. त्यानंतर जागतिक स्पर्धेची तयारी करेन. पण माझ्यापुढे आर्थिक अडचण असल्याने मी प्रायोजकाच्या प्रतीक्षेत आहे. मी आतापर्यंत सेनादलाच्या मदतीच्या जोरावरच धावलो आणि यापुढेही त्याच जोरावर वाटचाल करेन.’----------------------------यंदा मुंबई मॅरेथॉन मार्गात थोडा बदल करण्यात आला होता. तसेच, सुरुवातीला आणि अंतिम क्षणी लोकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला. याशिवाय धावताना मार्गात काही हौशी धावपटूंचा अडथळाही झाला. बाईकर्सही आमच्या मधेमधे येते असल्याने अनेकदा गर्दीतून आम्ही मार्ग काढला. याशिवाय आम्हाला कुठेही अडचण आली नाही, पण हे होतंच असतं. - नितेंद्रसिंग रावत