दिल्ली : सलामीवीर श्रेयश अय्यर आणि कर्णधार जेपी ड्युमिनी यांच्या आक्रमक शतकी भागीदारीनंतर इम्रान ताहीर व अमित मिश्राच्या फिरकीच्या जोरावर दिल्लीने तिसरा विजय नोंदवताना मुंबई इंडियन्सला ३७ धावांनी नमवले. विशेष म्हणजे या विजयासह दिल्लीने घरच्या मैदानावरील सलग ९ पराभवांची मालिकादेखील खंडित केली. फिरोजशाह कोटला स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दडपणाखाली आलेल्या मुंबईने पराभव ओढावून घेतला. नाणेफेक जिंकून मुंबईने क्षेत्ररक्षण स्वीकारले. दिल्लीने निर्धारित २० षटकांत ४ बाद १९० धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात मुंबईला २० षटकांत ९ बाद १५३ अशी मजल मारता आली.भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर लेंडल सिमेन्स आणि पार्थिव पटेल यांनी मुंबईला चांगली सुरुवात करुन दिली. सिमेन्स, पटेल, उन्मुक्त चंद आणि भरवशाचा किरॉन पोलार्ड ठराविक अंतराने बाद झाल्याने मुंबईची १०.२ षटकांत ४ बाद ८२ अशी अवस्था झाली. यानंतर कर्णधार रोहित शर्मा (३०) आणि अंबाती रायुडू (३०) यांनी ५व्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी करून मुंबईला सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु कुल्टर-नाइलने शर्माला बाद करीत मुंबईला मोठा धक्का दिला. इम्रान ताहीरने टाकलेले १७वे षटक नाट्यमय व निर्णायक ठरले. या षटकातील पहिल्या, तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर त्याने अनुक्रमे हार्दिक पांड्या (०), रायडू आणि मॅक्क्लेनेगन (०) यांना बाद करीत दिल्लीचा विजय निश्चित केला. यावेळी दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या हरभजनला केवळ बघ्याची भूमिका घ्यावी लागली. तत्पूर्वी विजयाच्या निर्धाराने दिल्ली स्वारीला गेलेल्या मुंबईकरांची यजमानांनी चांगलीच धुलाई केली. सलामीवीर श्रेयश अय्यर (५६ चेंडूत ८३ धावा) आणि कर्णधार जेपी ड्युमिनी (५० चेंडूत नाबाद ७८) यांनी दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या १५४ धावांची आक्रमक शतकी भागीदारी केली. पहिल्याच षटकात मयांक अगरवाल बाद झाल्यानंतर अय्यर आणि कर्णधार ड्युमिनीने तुफान फटकेबाजी करताना मुंबईकरांना चोपले. हरभजनसह सर्वच गोलंदाजांना दिल्लीचा मार खावा लागला. एकटा मलिंगा अचूक मारा करीत असताना त्याला इतर गोलंदाजांकडून उपयुक्त साथ मिळाली नाही. यंदाच्या सत्रात दिल्लीसाठी यशस्वी ठरलेला ‘मुंबईकर’ श्रेयश अय्यरने ५६ चेंडूत ७ चौकार व ५ षटकार टोलावताना मुंबईची गोलंदाजी फोडून काढली. ड्युमिनीने देखील मुंबईकरांचा खरपूस समाचार घेताना ५० चेंडूंचा सामना करताना केवळ ३ चौकार मारत ६ षटकारांची आतषबाजी केली. या दोघांनी संपुर्ण डावामध्ये वर्चस्व राखताना मुंबईकरांना सळो की पळो करुन सोडले. शेवटच्या सत्रात मुंबईकरांनी केलेल्या चांगल्या गोलंदाजीमुळे दिल्लीला दोनशेचा टप्पा गाठता आला नाही. मॅक्कलेनघनने २ तर मलिंगा आणि बुमराहने प्रत्येकी एक बळी घेतला. (वृत्तसंस्था)
मुंबईला राजधानीची धडक
By admin | Updated: April 24, 2015 09:29 IST