नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस बाक यांचा भारत दौरा आटोपताच हॉकी इंडिया आणि बॉलिंग फेडरेशनने भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे(आयओए) अध्यक्ष एन. रामचंद्रन यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याची घोषणा केली. हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र ध्रुव बत्रा आणि महासचिव मुश्ताक अहमद यांनी आयओए अध्यक्ष, महासचिव आणि कोषाध्यक्षांना पत्र लिहून आयओए संविधानाच्या नियम ८ (१) आणि (२) नुसार रामचंद्रन यांच्यावर अविश्वास आणण्याची तयारी दर्शविली. आम्ही पूर्णपणे रामचंद्रन यांच्या कार्यशैलीविरोधात आहोत. आयओएला कमकुवत करण्याचे आणि नष्ट करण्याचे प्रकार घडत असल्याची आमची भावना झाली आहे. बत्रा यांनी आयओएची विशेष आमसभा बोलविण्याची मागणी केली असून, त्यात रामचंद्रन यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यात येणार असल्याचे सांगितले.भारतीय बॉलिंग फेडरेशननेदेखील हॉकी इंडियाच्या धर्तीवर रामचंद्रन यांच्यावर अविश्वास आणण्यासाठी कंबर कसली आहे. फेडरेशनच्या अध्यक्ष सुनयनाकुमारी आणि महासचिव डी. आर. सैनी यांनीदेखील आयओएची विशेष आमसभा लवकर बोलविण्याची मागणी केली. दरम्यान, जम्मू-काश्मीर आॅलिम्पिक संघटनेचे महासचिव आशुतोष शर्मा यांनी आयओएतील भोंगळ कारभार संपविण्यासाठी आमसभा लवकर आयोजित करण्यावर भर दिला.आयओएवरील १४ महिन्यांचे निलंबन मागच्याच वर्षी संपुष्टात आले. आयओएला स्वत:मध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे मत आयओसी प्रमुखांनी नुकतेच मांडले. बत्रा यांनी तर बाक यांचे रामचंद्रन यांनी फारच साधारण स्वागत केल्याची टीका करीत, काही फोटो फेसबुकवरदेखील टाकले होते. (वृत्तसंस्था)
रामचंद्रन यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव
By admin | Updated: May 3, 2015 00:08 IST