बर्मिंघम : चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताकडून पराभव पत्करल्यानंतर पाकिस्तान संघाने आज दमदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला चांगलेच अडचणीत आणले. त्यांनी द. आफ्रिकेला ५० षटकांत ८ बाद २१९ धावांवर रोखले. ७५ धावांवर नाबाद राहिलेल्या डेव्हिड मिलरने एकाकी झुंज देत आफ्रिकेचा डाव सांभाळला. बर्मिंघममध्ये सुरू असलेल्या या लढतीत द.अफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीवीर हशीम आमला आणि क्विंटन डी कॉक यांनी ४० धावांची भागीदारी केली. हे दोन्ही फलंदाज आफ्रिकेला चांगली धावसंख्या उभी करून देतील असे वाटत असतानाच इमाद वसीम याने आमलाला पायचीत पकडले. त्यानंतर १४ व्या षटकांत क्विंटन डी कॉकलाही मोहम्मद हाफीज याने तंबूत परत पाठवले. डी कॉक याने ४९ चेंडूत ३३ धावा केल्या. धडाकेबाज एबी डिव्हिलियर्स याला इमाद वसीम याने पहिल्याच चेंडूवर खातेही उघडू न देता बाद केले. फाफ डु प्लेसीस याने २६ धावा केल्या. डेव्हिड मिलर याने १०४ चेंडूत नाबाद ७५ धावा केल्या. पाकिस्तानकडून हसन अली याने ३ गडी बाद केले, तर जुनैद खान व इमाद वसीम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
मिलरची झुंज, द.आफ्रिकेला रोखले
By admin | Updated: June 8, 2017 04:10 IST