नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची घोषणा केली. यानुसार यंदा चार खेळाडूंना देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेल्या ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ पुरस्कार जाहीर झाला. यामध्ये नेमबाज मनू भाकर, विश्वविजेता बुद्धिबळपटू डोम्माराजू गुकेश, हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि दिव्यांग ॲथलिट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
जलतरणपटू मुरलीधर पेटकर यांना जीवनगाैरव- देशाला पॅरालिम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक पटकावून देणारे मराठमोळे जलतरणपटू मुरलीधर पेटकर यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. - पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणारा महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वप्नील हा दीपाली यांच्याच मार्गदर्शनाखाली घडला असून, एकाचवेळी या गुरू-शिष्याचा पुरस्काराने गौरव होईल.
- एकूण ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाठी निवडण्यात आले असून यामध्ये १७ दिव्यांग खेळाडूंचा समावेश आहे. ‘खेलरत्न’ पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा पदक, प्रमाणपत्र आणि २५ लाख रुपये देऊन सन्मान होतो. ‘अर्जुन’ पुरस्कारप्राप्त खेळाडूंना १५ लाख रुपयांसह अर्जुनाची मूर्ती आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येतो.