मुंबई : महाराष्ट्राचा ११ वर्षीय संकर्षा शेळके याने शानदार कामगिरीसह बाजी मारताना ८व्या मुंबई महापौर आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेच्या ‘ब’ विभागाचे विजेतेपद पटकावले. त्याचसोबत त्याने रोख एक लाख रुपयांच्या बक्षिसावर देखील कब्जा केला. दुसऱ्या बाजूला ग्रँडमास्टर एनग्युएन ड्यूक होआ, झीआॅर रेहमान आणि मार्टिन क्रेवस्टीव यांनी चमकदार विजय नोंदवताना अनुक्रमे ग्रँडमास्टर पंत्सुलेया लेवान, ग्रँडमास्टर अलेक्झांड्रोव्ह अॅलेक्सेझ आणि पी. कार्तिकेयन या कसलेल्या खेळाडूंना धक्का दिला.गोरेगाव स्पोटर््स क्लब येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संकर्षा याने स्पर्धेच्या अंतिम क्षणी आपला खेळ उंचावून गटावर वर्चस्व राखले. त्याचवेळी मध्यप्रदेशच्या अश्विन डॅनिएल आणि महाराष्ट्राच्या सिध्दांत गायकवाड यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानावर कब्जा केला. स्पर्धेच्या मुख्य फेरीमध्ये मात्र धक्कादायक निकालांनी दिवस गाजवला. व्हिएतनामचा ग्रँडमास्टर एनग्युएन याने माजी विजेत्य ग्रँडमास्टर पंत्सुलेया याला अवघ्या २८ चालींमध्ये हार मानण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे काळ्या मोहऱ्यांनी खेळताना एनग्युएनने इंग्लिश सुरुवात करताना पंत्सुलेयावर वर्चस्व राखले. बांगलादेशचा ग्रँडमास्टर रेहमानने देखील लक्ष वेधताना कसलेल्या अलेक्झांड्रोव्हचा पराभव केला. पाचव्या बोर्डवर झालेल्या अन्य एका अटीतटीच्या लढतीत ग्रँडमास्टर क्रेवस्टीव्ह मार्टीनने मार्कोझी बाइंड पध्दतीने खेळताना पी. कार्तिकेयनचा सिसिलियन बचाव भेदला. सुरुवातीला सावध खेळ करताना दोन्ही खेळाडूंनी सामन्यात ४५ व्या चालीपर्यंत बरोबरी राखली होती. यानंतर मात्र क्रेवस्टीव्हने जबरदस्त हल्ला चढवताना कार्तिकेयनला हतबल केले. या अनपेक्षित आक्रमणामुळे कार्तिकेयनची एकाग्रता भंग झाली व त्याने सपशेल हार पत्करली.
महाराष्ट्राच्या संकर्षाचे विजेतेपद
By admin | Updated: June 6, 2015 01:08 IST