कोलकाता : ‘जर, सर्वोच्च न्यायालयाद्वारा नियुक्त करण्यात आलेल्या लोढा समितीच्या आयपीएलसंबंधी शिफारशींना लागू करण्यात आले, तर बीसीसीआयला मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागेल,’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी सांगितले.लोढा समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार राष्ट्रीय कॅलेंडर आणि आयपीएल स्पर्धेदरम्यान कमीत कमी १५ दिवसांचे अंतर असणे आवश्यक आहे. याविषयी ठाकूर म्हणाले, ‘जर, संपूर्ण वेळापत्रकावर नजर टाकली, तर दिसून येईल की, या शिफारशीनुसार आयपीएल स्पर्धा आयोजित करणे शक्य होणार नाही. यामुळे बीसीसीआयला शेकडो करोड रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागेल.’ मोठ्या आर्थिक नुकसानीकडे अधिक जोर देताना ठाकूर म्हणाले की, ‘पैसा माजी क्रिकेटपटूंना दिला जातो. माजी क्रिकेटपटूंना ११० करोड रुपयांहून अधिक पैसे दिले गेले. जर आंतरराष्ट्रीय वेळापत्रकाच्या कारणाने आयपीएल बंद करण्यात आली, तर भारतीय क्रिकेटचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे संपूर्ण परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागेल. (वृत्तसंस्था)
लोढा शिफारशीमुळे बीसीसीआयचे मोठे नुकसान होईल : ठाकूर
By admin | Updated: October 3, 2016 06:11 IST