Lionel Messi's India tour itinerary revealed : फुटबॉल जगतात अधिराज्य गाजवणारा अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटूलिओनेल मेस्सी डिसेंबरच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार आहे. कोलकाता येथे आगमन झाल्यावर बार्सिलोनाचा स्टार अहमदाबाद, मुंबई या शहरांना भेट देईल. याशिवाय नवी दिल्लीत तो पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही भेट घेणार आहे. इथं एक नजर टाकुयात कसा असेल लिओनेल मेस्सीचाभारत दौरा त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोलकाता येथे पहिला मुक्काम, जगातील मोठ्या पुतळ्याचं अनावरण
पीटीआयच्या वृत्तानुसार, सिटी ऑफ जॉय अर्थात कोलकाता येथे तो दोन दिवसाच्या दौऱ्यात एक दिवस मुक्काम करेल. मेस्सीचा भारत दौरा भेटीगाठीच्या कार्यक्रमासह सुरू होईल. भारतातील फुटबॉलच्या शहरातील व्हीआयपी रोडवरील लेक टाउन श्रीभूमी येथे अर्जेंटिनाच्या स्टारचा ७० फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे, असा दावा करण्यात येत आहे.
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
मेस्सीसाठी खास कार्यक्रम, बंगालच्या CM ममता बॅनर्जींचीही लावणार हजेरी
३८ वर्षीय फुटबॉलरचा दौरा खास करण्यासाठी प्रतिष्ठित ईडन गार्डन्स येथे GOAT कॉन्सर्ट आणि GOAT कप स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. GOAP कपमध्ये सौरव गांगुली, लिएंडर पेस, जॉन अब्राहम, बायचुंग भुतिया हे भारतीय लोकप्रिय खेळाडूही भाग घेतील. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील या कार्यक्रमात उपस्थित राहतील.
अहमदाबाद येथील कार्यक्रमात सहभागी होऊन मुंबईत पोहचणार
१३ डिसेंबर रोजी, मेस्सी अदानी फाउंडेशनच्या शांतीग्राम मुख्यालयात आयोजित एका खाजगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अहमदाबादला जाईल. दुसऱ्या दिवशी दुपारी ३.४५ वाजता मेस्सी मुंबईतील CCI ला भेट देईल. सायंकाळी ५.३० वाजता वानखेडे स्टेडियमवर GOAT कॉन्सर्ट आणि GOAT कपमध्येही तो सहभागी होईल.
मुंबईतही दिग्गजांची घेणार भेट
कोलकाता येथे दिग्गज खेळाडूंची भेट घेतल्यावर मुंबईतही मेस्सी एमएस धोनी, विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि अन्य दिग्गजांची भेट घेणार आहे. मुंबईमध्ये तो भारतीय फुटबॉल संघाला भेटण्याची देखील योजना आहे. १५ डिसेंबर रोजी मेस्सी दिल्ली येथे पंतप्रधान मोदींची भेट घेऊन भारत दौऱ्याची सांगता करेल.
असा आहे मेस्सीचा भारत दौरा (Lionel Messi's itinerary in India tour)
- १२ डिसेंबर: कोलकाता येथे पोहचणार (रात्री १० वाजता).
- १३ डिसेंबर (कोलकाता): सकाळी ९ वाजता - भेट आणि अभिवादन कार्यक्रम; लेक टाउन श्रीभूमी, व्हीआयपी रोड येथे पुतळ्याचे अनावरण (७० फूट); दुपारी १२ ते १.३० वाजता - ईडन गार्डन्स येथे GOAT कॉन्सर्ट आणि त्यानंतर सौरव गांगुलीचा समावेश असलेला GOAT कप स्पर्धेत सहभाग
- १३ डिसेंबर (संध्याकाळी): शांतीग्राम, अहमदाबाद येथे अदानी फाउंडेशनचा खाजगी कार्यक्रम
- १४ डिसेंबर (मुंबई): सीसीआय येथे भेट (दुपारी ३.४५ वाजता); वानखेडे स्टेडियमवर GOAT कॉन्सर्ट (सायंकाळी ५.३० वाजता).
- १५ डिसेंबर (नवी दिल्ली): पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट; फिरोजशाह कोटला येथे GOAT कॉन्सर्ट (दुपारी २.१५ वाजता).