लखनौ : अग्रमानांकित खेळाडू किदाम्बी श्रीकांत याने सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट प्रदर्शन सुरू ठेवत थायलंडच्या बुनसाक पोनसानाला शनिवारी २१-१४, २१-७ ने पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर, दुहेरीतील स्टार जोडी ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनाप्पाला कोरियाच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला.श्रीकांतने ११व्या मानांकित पोनसाना याला या सामन्यात ३२ मिनिटांत पराभूत केले. तर, महिला दुहेरीत ज्वाला आणि अश्विनीला ३९ मिनिटे चाललेल्या या सामन्यात कोरियाची दुसरी मानांकित जोडी जुंग क्युंग युन आणि शिन स्यूंग चान ने १४-२१,१६-२१ असे पराभूत केले. जगातील नवव्या क्रमांकाचा खेळाडू श्रीकांतने पोनसानाला या सामन्यात कोणतीही संधी दिली नाही. नुकत्याच झालेल्या मलेशिया मास्टर्समध्ये पराभूत केले. या थाई खेळाडूविरोधात त्याने तीन सामन्यांत विजय मिळवला आहे. तर, एका सामन्यात श्रीकांतला पोनसानाकडून पराभव पत्करावा लागला. श्रीकांतने पहिल्या गेममध्ये ६-२ अशी आघाडी घेतली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. त्याने ९-३ वरून १६-६ पर्यंत आघाडी वाढवली. आणि पहिला गेम २१-१४ वर संपवला. दुसऱ्या गेममध्ये सलग आठ गुण घेत ८-२ अशी आघाडी घेतली. त्यानंतर २१-७ असा गेम संपवला आणि विजय मिळवला. श्रीकांतची लढत अंतिम फेरीत चीनच्या हुआंग यूजियांगशी होईल. चीनच्या खेळाडून दुसऱ्या सेमीफायनलमध्ये चीनच्याच शी युकी ला एक तास १२ मिनिटे चाललेल्या या स्पर्धेत १७-२१, २२-२०, २१-१२ असे पराभूत केले. (वृत्तसंस्था)
किदाम्बी श्रीकांत अंतिम फेरीत
By admin | Updated: January 31, 2016 03:03 IST