गुवाहटी : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिस-या पर्वात महाराष्ट्राच्या मल्लांनी देखील आपल्या राज्याच्या पदकांचा वाटा उचलायला सुरुवात केली. कुस्ती स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने ग्रिको रोमन प्रकारात दोन सुवर्ण, एक रौप्य आणि तीन ब्रॉंझ अशी झकास सुरवात केली. ओंकार पाटील, सद्दाम शेख हे सुवर्णपदकाचे मानकरी ठरले.
लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थेच्या हॉलमध्ये आजपासून सुरू झालेल्या कुस्ती प्रकारात प्रतिक पाटील, प्रविण पाटील, कुंदन यादव ब्रॉंझ, तर विवेक सावंत रौप्यपदकाचा मानकरी ठरला.
मुलांच्यात १७ वर्षांखालील गटात ५१ किलो वजन प्रकारात सह्याद्री संकुलातच सराव करणा-या कोल्हापूरच्या विवेक सावंतने सुवर्णवपदकाची संधी गमावली. उत्तर प्रदेशाचा प्रतिस्पर्धी पंकज याच्याविरुद्ध अखेरच्या टप्प्यापर्यंत राखलेली आघाडी टिकविण्यात विवेकला अपयश आले. पंकजने लढत ५-५ अशी बरोबरीत सोडविताना अखेरचा गुण घेत सुवर्णपदक पदरात पाडले. विवेकला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मुलांच्या २१ वर्षांखालील गटातील ५५ किलो वजन प्रकारात कोल्हापूरच्या प्रविण पाटील याने राजस्थानच्या रवी याचा ९-० असा पराभव करून ब्रॉंझपदक मिळविले. त्यापूर्वी याच वयोगटातील ६७ किलो वजन प्रकारात कुंदन यादव याने लढतीवर नियंत्रणराखत भारंदाज डावाचा वापर करून आसामच्या रंजय याचा १ मिनीट ५५ सेकंदात १०-१ अशी आघाडी मिळवून तांत्रिक आधारावर विजय मिळविला.