आसाम, गुवाहटी : खेलो इंडिया युवा स्पर्धेच्या तिस-या पर्वाच्या पाचव्या दिवशी सोमवारी कोल्हापूरच्या मल्लांनी नव्हे, तर सायकलपटूंनी छाप पाडली. रोड रेसमध्ये मुलींच्या १७ वर्षांखालील गटात पूजा दानोळे हिने सलग दुस-या दिवशी सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर मुलांच्या याच वयोगटातून सिद्धेश पाटीलने ब्रॉंझ पदकाची कमाई केली.
सोनापूर हमरस्त्यावर झालेल्या या स्पर्धेत मुलींच्या ३० कि.मी. शर्यतीत पूजाने आपल्या लहान वयातच मिळविलेल्या अनुभवाच्या जोरावर वर्चस्व राखले. शर्यतीत तिस-या टप्प्यापर्यंत बहुतेक स्पर्धक एकत्रच आगेकूच करत होते. अखेरच्या एक कि.मी. अंतरावर पूजा या स्पर्धकांमधून थोडू पुढे आली आणि अखेरच्या शंभर मीटरला तिने वेग वाढवताना थाटात अंतिम रेषा गाठली. तिने ताशी ३५ कि.मी. वेगाने सायकलिंग करताना ५५ मिनीट ४२.३२ सेकंद अशी वेळ दिली. तिने गुजरातच्या मुस्कान गुप्ताला (५५ मिनीट ४२.४७ सेकंद) दशांश पंधरा सेकंदाने मागे टाकले. तिस-या क्रमांकासाठी मात्र चुरस झाली. दिल्लीची इशिका गुप्ता, चंडिगडची रीत कपूर या दोघींनी ५५ मिनीट ४२.७१ सेकंद अशी वेळ देत एकत्रच अंतिम रेषा गाठली. पण, फोटो फिनीशमध्ये इशिकाने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले.
मुलांच्या ५० कि.मी. अंतराच्या शर्यतीत बहुतेक स्पर्धकांच्या सायकिलंगचा वेग पाहून थक्क होण्यासारखे झाले. लहान वयातही या मुलांनी पाच टप्प्याच्या शर्यतीत ताशी ४० ते ४५ कि.मी. वेग राखला होता. यात दिल्लीच्या अर्शद फरिदी याने (१ तास ९ मिनीट ३६.२५ सेकंद) सहज बाजी मारली. त्याच्यानंतर हरियानाच्या रवी सिंगने १ तास ९ मिनीट३६.४३ सेकंद वेल देत रौप्यपदक पटकावले. महाराष्ट्राच्या सिद्धेश पाटीलने त्याला गाठण्याचा खूप प्रयत्न केला. पण, सिद्धेश (१तास ९ मिनीट ३६.४९ सेकंद) दशांश सहा सेकंदाने मागे राहिल्याने त्याला ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले.
त्यांच्याकडून धडे घेत असताना गेली दोन वर्षे तो पुण्यात क्रीडा प्रबोधिनीत दाखल झाला आणि त्याच्यातील सायकलपटूला पैलू पडत गेले. दीपाली पाटिल यांच्याकडून मार्गदर्शन घेत सिद्धेश प्रथमच खेलो इंडियात सहभागी झाला आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने ब्रॉंझपदकाची कमाई केली. तो म्हणाला, अंतिम रेषेवर बिनधास्त राहायची आणि मागे बघण्याची सवय मला नेहमीच मारक ठरते. या वेळीही ठरली. नाही, तर रौप्यपदक मिळविले असते. यंदाच्या पावसाळ्यात सिद्धेशचे घर सात दिवस पाण्यात होते. ऊसाच्या पिकाचेही नुकसान झाले. त्यानंतरही हे दु:ख विसरून कुटुंबिय पाठिंबा देत आहेत. त्यांच्यासाठी मला मोठे व्हायचे आहे, असेही सिद्धेशने सांगितले. या पदकाचे वडिलांना कळविले, तेव्हा आता पुढचा दिवस चांगला जाईल, ही त्यांची भावना माज्यासाठी पदकापेक्षा मोठी वाटते, अशी भावनाही त्याने व्यक्त केली.