नवी दिल्ली : गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता बॅडमिंटनपटू पी. कश्यपच्या आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्याच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत. त्याला दुखापतीमुळे या महिन्यात होणाऱ्या मलेशिया सुपर सिरीज व सिंगापूर ओपन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. कारकिर्दीतील सर्वांत खडतर कालखंडातून मार्गक्रमण करीत असलेल्या कश्यपला या दोन्ही स्पर्धांपूर्वी दुखापतीतून सावरण्याची आशा होती, पण आता ते शक्य नाही. कश्यप म्हणाला,‘या महिन्यात कुठल्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. दुखापत गंभीर आहे. माझ्या मते सुरुवातीलाच योग्य उपचार झाले नाही. दोन आठवड्यात फिट होईल, असे मला सांगण्यात आले होते, पण तसे घडले नाही.’कश्यप पुढे म्हणाला,‘दोन आठवड्यांमध्ये खेळू शकेल, असे वाटले होते, पण आता निराश झालो. मला आणखी तीन आठवडे प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानंतर भविष्यात काय करायचे, याबाबत निर्णय घेईल. कदाचित मे किंवा जून महिन्यात मला कोर्टवर उतरता येईल.’दरम्यान, भारताचे विनीत मॅन्युअल व एस. सजीत यांना मलेशियन ओपन स्पर्धेत क्वालीफायरमध्ये डॅरेन इसाक व जिन वा तान यांच्याविरुद्ध १५-२१, १२-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. (वृत्तसंस्था)
दुखापतीमुळे कश्यपचे आॅलिम्पिकचे स्वप्न भंगले
By admin | Updated: April 6, 2016 04:36 IST