नवी दिल्ली : आयपीएलच्या दोन नवीन संघांची घोषणा मंगळवारी केली जाणार आहे. २०१६ च्या सत्रात हे दोन नवीन संघ खेळतील. मंगळवारी संचालन परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात हा निर्णय होईल.सर्वोच्च न्यायालयाने आयपीएल ६ मधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे. त्यामुळे बीसीसीआयला आयपीएलच्या या दोन सत्रांसाठी नवीन संघांचा समावेश करावा लागेल. बीसीसीआयने रविवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, की आयपीएलच्या २०१६ आणि २०१७ च्या सत्रासाठी दोन नवीन संघांची घोषणा आठ डिसेंबरला होईल. आयपीएलच्या संचलन परिषदेची बैठक मंगळवारी दिल्लीत होणार आहे. त्यात दोन संभाव्य संघ आणि त्यांच्या मालकांची घोषणा केली जाईल. या बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर, सचिव अनुराग ठाकूर, आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला उपस्थित राहणार आहेत. आयपीएल प्रमुख शुक्ला म्हणाले, की संचालन परिषदेने निर्णय घेतला आहे, की जयपूर आणि कोच्चीला नवीन संघांच्या रूपात सहभागी करून घेतले जाणार नाही. बीसीसीआयने ३० नोव्हेंबरला निविदा प्रक्रिया बंद केली होती. या बैठकीनंतर दोन नव्या संघासोबतच राजस्थान आणि चेन्नईचे भवितव्यही निश्चित होईल. अजून बोर्डाने स्पष्ट केलेले नाही, की राजस्थान व चेन्नई संघांबाबत काय होईल. दोन्ही संघ दोन वर्षांच्या बंदीनंतर पुन्हा आयपीएलचा भाग बनतील, की नाही व दोन नवीन संघ फक्त २ वर्षांसाठीच आयपीएलसोबत जोडले जातील. याबाबत अजून स्पष्टता करण्यात आलेली नाही.
आयपीएलच्या संघांची मंगळवारी घोषणा
By admin | Updated: December 6, 2015 23:23 IST