नेमबाजी संघटनेवर चौकशी समितीचे ताशेरेनवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमधील भारतीय नेमबाजांच्या खराब कामगिरीची चौकशी करण्यासाठी अभिनव बिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या खराब कामगिरीसाठी समितीने प्रशिक्षक व संघटना या दोघांनाही जबाबदार धरले आहे. त्याचबरोबर यात आमूलाग्र बदल करण्याची शिफारस करण्यात आली आहे.समितीने गगन नारंग, हीना सिद्धू यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंबरोबर आयोनिका पालसारख्या नवोदित खेळाडूवरही ताशेरे ओढले आहेत. हीनाने आपला पती रोनक पंडित यांनाच प्रशिक्षक बनविल्याबद्दल टीका झाली होती. हीनाने राष्ट्रीय प्रशिक्षक पावेल स्मिरनोव्ह यांना कोणत्याही प्रकारे सहकार्य केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आयोनिकाने आपल्या आर्थिक फायद्यासाठी थॉमस फारनिक यांना प्रशिक्षक, तर सुमा शिरूर यांना मार्गदर्शकपदी दाखविले. मात्र, सुमाच तिची पूर्णवेळ प्रशिक्षक होती.रिओमध्ये भारताचे १२ नेमबाज सहभागी झाले होते. मात्र, या प्रकारात भारताला एकही पदक मिळविता आले नाही. अभिनव बिंद्रा १० मीटर एअर रायफल गटात चौथ्या क्रमांकावर राहिला. ही भारतीयांची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. यामुळे नेमबाजीतील कामगिरीची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत होती. समितीने नेमबाजीमध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.समितीने जीतू राय प्रशिक्षक स्मिरनोव्ह यांच्याबरोबर सूर जुळवू शकला नाही, तर प्रकाश नंजप्पा याच्यासाठी स्मिरनोव्ह यांच्याकडे कोणतीही विशेष योजना नसल्याचे स्पष्ट झाले. समितीने गगन नारंग याच्यावरही कडक ताशेरे ओढले आहेत. नारंग स्पर्धेत घोट्याच्या दुखापतीसह उतरला होता. तसेच त्याने त्याच्यासाठी बनविण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाकडे साफ दुर्लक्ष केले होेते. अपूर्वी चंदेला याला प्रशिक्षकासाठी झगडावे लागले, हे सर्वांत चकीत करणारे असल्याचे मत समितीने व्यक्त केले आहे. नेमबाज बिंद्रा याला नशिबाने साथ दिली नसल्याचे मत व्यक्त करून त्याच्या कारकिर्दीचा शेवट परीकथेसारखा झाला नसल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)रिओची तयारीच चुकीच्या दिशेने होतीचारसदस्यीय समितीने आपल्या ३६ पानांच्या अहवालात कामगिरीचे कडक समीक्षा करण्यात आली आहे. समितीत म्हटले आहे, की २००४ च्या अथेन्स आॅलिम्पिकनंतर नेमबाजीतील कामगिरीमुळे सर्वांनाच आत्ममग्न केले होते. सर्वांना वाटले, की या खेळात आता आपोआप प्रगती होईल. त्यामुळे यासाठी विशेष प्रयत्न करण्याचेच सर्व जण विसरून गेले. समितीने म्हटले आहे, की रिओ आॅलिम्पिकसाठीची तयारीच चुकीच्या दिशेने होती. भारतीय नेमबाजांना गेल्या काही वर्षांत मिळालेले यश म्हणजे फक्त नशिबाची साथ होती.
नेमबाजी संघटनेवर चौकशी समितीचे ताशेरे
By admin | Updated: October 6, 2016 04:57 IST