R Praggnanandhaa Defeats World No. 1 Magnus Carlsen : लास वेगास येथे सुरु असलेल्या फ्रीस्टाइल बुद्धिबळ ग्रँडस्लॅम स्पर्धेत भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद याने लक्षवेधी कामगिरी करुन दाखवली आहे. भारताच्या युवा बुद्धिबळपटूनं नॉर्वेचा ग्रँडमास्टर आणि बुद्धिबळ जगतातील अग्रमानांकित मॅग्नस कार्लसन याला चौथ्या फेरीत पराभवाचा धक्का दिलाय. आर. प्रज्ञानंद याची आतापर्यंतच्या छोट्या कारकिर्दीतील हा एक मोठा विजय आहे. त्याने फक्त ३९ चालीत बुद्धिबळाच्या पटलावरील नंबर वन खेळाडूला मात दिली. याआधी विद्यमान विश्व चॅम्पियन डी. गुकेश यानेही नॉर्वेच्या खेळाडूला पराभवाचा धक्का दिला होता. भारताच्या युवा ग्रँडमास्टर्स समोर नॉर्वेच्या बुद्धिबळपटूची बुद्धी चालेना, असेच चित्र सध्या दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
स्पर्धेतील आपल्या गटात अव्वलस्थानी पोहचला आर. प्रज्ञानंद नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन विरुद्धच्या लढतीतील विजयासह आर. प्रज्ञानंद ४.५ गुणांसह या स्पर्धेतील आठ खेळाडूंच्या गटात संयुक्तरित्या अव्वलस्थानी पोहचला आहे. या स्पर्धेत आर. प्रज्ञानंद याने कार्लसन विरुद्ध क्लासिकल, रॅपिड आणि ब्लिट्ज तिन्ही प्रकारात सर्वोत्तम खेळ केला. दुसऱ्या बाजूला नॉर्वेचा कार्लसन चांगलाच संघर्ष करताना दिसून आले.
पहिला सामना अनिर्णित, मग आर प्रज्ञानंद याने सुरु केला विजयी सिलसिला
प्रज्ञानंद याने या स्पर्धेची सुरुवात ही उझबेकचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव याच्या विरुद्धच्या लढतीसह केली होती. सलामीची लढत अनिर्णित राखल्यावर दुसऱ्या फेरीत त्याने कझाकिस्तानच्या असाउबायेवा विरुद्धची लढत जिंकली. तिसऱ्या फेरीत सातत्य कायम राखत त्याने जर्मनीच्या ग्रँडमास्टर कीमरला मात दिली. चौथ्या फेरीत वर्ल्ड नंबर वन कार्लसनला पराभूत करत तो या स्पर्धेतील जेतेपदाचा प्रबळ दावेदार झालाय.
आर.प्रज्ञानंद विरुद्ध कार्लसन रेकॉर्ड
जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान असलेल्या कार्लसन आण आर प्रज्ञानंद यांच्यात आतापर्यंत १९ सामने झाले आहे. एकंदरीत रेकॉर्ड हा नॉर्वेच्या वर्ल्ड नंबर वन खेळाडूच्या बाजूनं आहे. तो ८-५ असा आघाडीवर असून दोघांच्यातील ६ लढती अनिर्णित राहिल्या आहेत. २०२४ मध्ये नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत आर. प्रज्ञानंद याने कार्लसनला पहिल्यांदा मात दिली होती.