ऑनलाइन लोकमत
पर्थ, दि. ९ - भारतीय गोलंदाजांच्या भेदक मा-यासमोर वेस्ट इंडिजचा डाव १८२ धावांवर आटोपला असून भारतातर्फे मोहम्मद शमीने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या आहेत. वर्ल्डकपमध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षणासाठी भारतीय संघाचे कौतुक केले असले तरी या सामन्यात भारतीय क्षेत्ररक्षकांनी तब्बल ४ झेल सोडले. या ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे विंडीजला १८१ धावांचा सन्मानजनक आकडा गाठता आला.
वर्ल्डकपमध्ये शुक्रवारी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हे संघ आमने सामने होते. विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक मा-याने विंडीजची अक्षरशः वाताहत झाली. यंदाच्या विश्वचषकात द्विशतक ठोकणारा ख्रिस गेल (२१ धावा) याच्यासह विंडीजचे आघाडीचे सर्व फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. वेस्ट इंडिजची अवस्था ७ बाद ८५ धावा अशी होती. यानंतर डॅरेन सॅमी (२६ धावा ) आणि कर्णधार जेसन होल्डरने विंडीजला १२५ चा पल्ला गाठून दिला. सॅमी बाद झाल्यावर होल्डरने जेरोम टेलरच्या (११ धावा) साथीने विंडीजला १५० टप्पा गाठून दिला. होल्डरने ५७ धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.
भारतातर्फे मोहम्मद शमीने ३ विकेट, उमेश यादव व रविंद्र जडेजाने प्रत्येकी दोन तर आर. अश्विन व मोहित शर्माने प्रत्येकी एक विकेट घेतली.