- रोहित नाईक, मुंबईमिस्टर युनिव्हर्स स्पर्धेचा अनुभव खूप चांगला आणि कारकिर्दितील सर्वोत्तम क्षण होता. पहिल्यांदाच स्पर्धेत सहभागी होताना दडपण होते आणि तरीही कांस्यपदक पटकावण्यात यश आल्याने आत्मविश्वास कमालीचा वाढला. त्यामुळेच आता पुढील महिन्यात बँकॉक येथे रंगणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतासाठी चमकदार कामगिरी करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे, असे मुंबईचा उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू सुनीत जाधव याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.१६ व १७ डिसेंबरला मुंबईत होणाऱ्या क्लासिक बॉडिबिल्डिंग स्पर्धेसाठी सुनीतने जोरदार तयारी केली असून, या स्पर्धेत अव्वल राष्ट्रीय खेळाडूंना टक्कर देऊन तो वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी स्वत:ला आजमवणार आहे. ४० सदस्यांचा भारतीय संघ २४ डिसेंबरला बँकॉकसाठी रवाना होणार असून, यामध्ये सुनीतचा समावेश आहे. तसेच जगदीश लाड या अन्य एका महाराष्ट्राच्या खेळाडूचाही भारतीय चमूत समावेश आहे.मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेच्या अनुभवाविषयी सुनीत म्हणाला की, या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होताना माझ्यावर खूप दडपण होते. जागतिक दर्जाच्या बॉडीबिल्डरांविरुद्ध कसब लागणार असल्याने मी त्या दृष्टीने स्वत:ला तयार केले होते. तरीही घरच्या प्रेक्षकांनी दिलेल्या पाठिंब्याच्या जोरावर कांस्यपदक पटकावण्यात यश आले. यानंतर मी सुवर्ण पटकावू शकतो याची जाणीव झाली. त्यानुसार मी कसून सराव केला आणि स्वत:ला सज्ज केले आहे.मि. युनिव्हर्सनंतर सुनीतने अधिक मेहनत घेताना आपली शरीरयष्टी आणखी पीळदार केली. याबाबत तो म्हणाला की, कामगिरीत सुधारणा असेल तरच यश मिळते. त्यानुसार मी अधिक मेहनत घेतली. बँकॉक येथील स्पर्धा आणखी अटीतटीची होईल याची कल्पना आहे. जागतिक खेळाडूंसमोर स्वत:ला सिद्ध करायचे असल्याने मी सरावामध्ये आणि शरीरयष्टीत सुधारणा करण्यामध्ये कोणतीही कसर ठेवलेली नाही. बॉडीबिल्डिंगला युवांचा मोठा प्रतिसाद लाभतो. त्यांच्यासाठी युनिव्हर्सिटी स्पर्धा खूप महत्त्वाची आहे. १२ डिसेंबरला युनिव्हर्सिटीच्या स्पर्धा रंगणार असून, याकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. व्यावसायिक स्पर्धेची ही पहिली पायरी आहे. या स्पर्धेद्वारे त्यांना नोकरीच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात. उत्तम शैक्षणिक पात्रता व योग्य वयात मिळणारी नोकरी यामुळे त्यांना बॉडिबिल्डिंग खेळाकडे चांगल्या प्रकारे लक्ष देता येईल. - सुनीत जाधव
भारतासाठी चमकदार कामगिरी करणार
By admin | Updated: November 18, 2015 02:06 IST