इंचियोन : नेमबाजीमध्ये पुरुष पिस्तूल संघाने रौप्यपदकाची कमाई केली, तर जलतरणपटू संदीप सेजवालने कांस्यपदक पटकाविले असले तरी भारताची १७ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सातव्या दिवशी एकूण १७ पदकांसह १६ व्या स्थानी घसरण झाली. लंडन आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेता विजय कुमार, पेम्बा तमांग व गुरप्रित सिंग यांचा समावेश असलेल्या पिस्तूल संघाने २५ मीटर सेंटर फायर पिस्तूल स्पर्धेत एकूण १७४० चा स्कोअर करीत रौप्यपदक पटकाविले. चीनने १७४२ गुणांसह सुवर्णपदकाचा मान मिळविला. जलतरणामध्ये २५ वर्षीय सेजवालने ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोकमध्ये कांस्यपदक पटकाविले. दुसऱ्या हिटमध्ये अव्वल स्थान पटकावित सेजवाल अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. अंतिम फेरीत सेजवालने २८.२६ सेकंद वेळेसह कांस्यपदक पटकाविले. स्क्वॅशमध्ये भारतासाठी आनंदाची वार्ता आहे. भारताच्या पुरुष व महिला संघांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे उभय गटांमध्ये भारताचे किमान रौप्यपदक निश्चित झाले आहे. भारतीय पथकासाठी आजचा दिवस संमिश्र ठरला. बॅडमिंटनच्या एकेरीमध्ये स्टार खेळाडू सायना नेहवाल व पी. कश्यप यांचे आव्हान संपुष्टात आले, तर तिरंदाजीमध्ये वैयक्तिक रिकर्व्ह इव्हेंटमध्ये भारताची कामगिरी निराशाजनक ठरली. भारतीय महिला हॉकी संघाने मलेशियाचा ६-१ ने पराभव करीत पदकाच्या शर्यतीत कायम राखले. भारताच्या खात्यात आज दोन पदकांची भर पडली असली भारताची १६व्या स्थानी घसरण झाली. भारताने आतापर्यंत एक सुवर्ण, दोन रौप्य व १४ कांस्य पदकांची कमाई केली आहे. चीन १७२ पदकांसह (८८ सुवर्ण, ४७ रौप्य व ३७ कांस्य) अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर दक्षिण कोरिया (३१ सुवर्ण, ३७ रौप्य, ३५ कांस्य) आणि जापान (२९ सुवर्ण, ३९ रौप्य व ३४ कांस्य) यांचा क्रमांक आहे. (वृत्तसंस्था)
भारताची १६ व्या स्थानी घसरण
By admin | Updated: September 27, 2014 02:53 IST