रोहित नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दिव्या देशमुखने जिंकलेला विश्वचषक भारतीय बुद्धिबळासाठी, विशेषतः भारतीय महिला बुद्धिबळासाठी फार मोठी घटना आहे. विश्वचषक किंवा जागतिक अजिंक्यपद स्पर्धाना चिनी खेळाडू खूप महत्त्व देतात. १९९० पासून महिला जागतिक अजिंक्यपदावर चीनचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे भारतीयांनी चिनी वर्चस्वाला धक्का दिला आहे, असे ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांनी 'लोकमत'ला सांगितले.
स्पर्धेतील महिला विश्वचषक भारतीयांच्या कामगिरीबाबत ठिपसे म्हणाले की, 'यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत चिनी खेळाडूंचे मानांकन वरचढ होते. दिव्याला १५वे मानांकन होते. त्यामुळे १५व्या मानांकनाची खेळाडू विश्वचषक पटकावते, ही अत्यंत दुर्मीळ बाब आहे. चिनी खेळाडूंना नमवणे सोपे नसते आणि दिव्या तसेच कोनेरू हम्पी यांनी आपल्या प्रवासादरम्यान मातब्बर चिनी खेळाडूंना पराभूत केले.'
दिव्याचे कौतुक करताना ठिपसे म्हणाले की, 'दिव्या बेधडक आहे. टायब्रेकमध्ये दुसरा डावही बरोबरीत जात असताना दडपणात आलेल्या हम्पीकडून चूक झाली आणि बाजी पलटली. तिला वेळेशी सांगड घालता आली नाही.'
त्याचप्रमाणे, 'डाव सुरू झाला, तेव्हा दिव्याच्या १५ मिनिटांमध्ये, १६ मिनिटे अशी वाढ झाली. ती पटापट चाली रचत असल्याने तिचा वेळ वाढला. जेव्हा तिच्याकडे १६.३० मिनिटे होती, तेव्हा हम्पीकडे केवळ ८ मिनिटे होती. हम्पी विचार करून खेळत होती आणि दिव्या आक्रमकपणे खेळली. त्यामुळे दिव्याची तयारी पाहून हम्पीच्या मनात कुठेतरी चलबिचल झाल्यासारखे वाटले. यामुळेच तिच्याकडून चूक झाली. दिव्या महाभारतातील अर्जुनासारखी खेळली, तिला केवळ पक्ष्याचा डोळा दिसत होता,' असेही ठिपसे यांनी सांगितले.
हे यश १९८३ विश्वचषकासारखे!
ठिपसे यांनी सांगितले की, 'हम्पीचा खेळ पुन्हा एकदा बहरला आहे. तिचेही कौतुक करावे तेवढे कमीच आहे. २०१७ मध्ये आई बनल्यानंतर तिने खेळ जवळपास सोडलाच होता. मात्र, दोन वर्षांनी तिने पुनरागमन केले, तेव्हा तिने चेसबोर्ड उघडूनही पाहिला नव्हता. यानंतर तिने रॅपिड वर्ल्ड चॅम्पियनशिप पटकावली आणि मागे वळून पाहिले नाही. हे यश क्रिकेटच्या १९८३ सालच्या विश्वचषक विजयाप्रमाणे आहे. त्यावेळी जसे भारताला कोणीही गृहीत धरले नव्हते, तसेच यावेळीही भारतीयांना विश्वजेतेपदाचा दावेदार मानले नव्हते. २०२२ ऑलिम्पियाडपासूनच भारतीयांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला असून, आता भारतीय बुद्धिबळाच्या सुवर्णकाळाची तयारी सुरू झाली आहे.'