मुंबई : बलाढ्य भारतीय नौदलाने मुंबई हॉकी संघटना (एमएचएएल) सुपर डिव्हिजन गटात विजयी आगेकूच करताना केंद्रीय सचिवालय संघाचा २-० असा सहज पाडाव केला. त्याचवेळी दुसरीकडे मध्य रेल्वे संघाने दणदणीत विजय मिळवताना बॉम्बे रिपब्लिकन्सचा ७-१ असा धुव्वा उडवला.एमएचएएलच्या वतीने चर्चगेट येथील हॉकी स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत नौदलाने सहज विजयासह ७ संघांमधूनसर्वाधिक १३ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. पाच सामने खेळलेल्या नौदलाचा अखेरचा सामना बलाढ्य पश्चिम रेल्वेविरुद्ध होणार असून या सामन्याआधीच त्यांनी अंतिम फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला आहे.नियोजनबद्ध खेळ करताना नौदलाने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखले. नौदलाचे आक्रमण आणि भक्कम बचाव यापुढे सचिवालयाचा अखेरपर्यंत काहीच निभाव लागला नाही. नौदलाच्या एम. एस. ठाकूर याने सामन्यातील दोन्ही गोल नोंदवताना संघाच्या विजयात निर्णायक कामगिरी केली, तर बचावपटूंनी शानदार संरक्षण करताना सचिवालय संघाला गोल करण्यापासून रोखले.तत्पूर्वी अत्यंत एकतर्फी सामन्यात बलाढ्य मध्य रेल्वेने बॉम्बे रिपब्लिकन्सचा ७-१ असा फडशा पाडताना दणदणीत विजयाची नोंद केली. रेल्वेने चार सामन्यांतून ६ गुणांची कमाई केली आहे. नारद बहादूर याने रेल्वेच्या विजयात मोलाचे योगदान देताना मिळालेल्या तिन्ही पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावताना तीन गोल नोंदवले. तर मोहम्मद निझामुद्दीनने दोन गोल करून बहादूरला चांगली साथ दिली. विक्टो सिंग आणि राजेंद्र पवार यांनी प्रत्येकी एक गोल करताना संघाच्या विजयात हातभार लावला. रिपब्लिकन्स संघाकडून कार्तिक शर्माने एकमेव गोल करून एकाकी झुंज दिली. (क्रीडा प्रतिनिधी)
भारतीय नौदलाची अंतिम फेरीत धडक
By admin | Updated: October 13, 2016 04:46 IST