बंगळुरू : विश्वचषक पात्रता फेरीतून जवळपास बाहेर पडल्यानंतर भारत गुरुवारी गुआमविरुद्ध विश्वचषक फुटबॉल पात्रता फेरीत पहिला विजय नोंदवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. ‘ड’ गटात समावेश असलेल्या भारताने याआधीच्या आपल्या सर्व, पाचही सामन्यांत पराभवाचे तोंड पाहिले आहे. त्याच वेळी गुआम संघाने आपल्या ५ सामन्यांतून ७ गुणांची कमाई केली आहे. स्टीफन कॉन्स्टेंटाइन यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाकडे पात्रता फेरीतील पहिला विजय मिळवण्याची ही सुवर्णसंधी असेल. त्याच वेळी जूनमध्ये झालेल्या एका सामन्यात गुआनने भारताला २-१ असे नमवले असल्याने भारतीय संघ गाफील राहिल्यास मोठा फटकाही बसू शकेल. त्याच वेळी विश्वचषक पात्रता फेरीचा विचार केल्यास भारताचे आव्हान याआधीच जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे. इराण संघ सर्वधिक ११ गुणांसह गटात अग्रस्थानी आहे. तर, ओमान संघ ८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. गटविजेता संघ आणि ४ दुसरे सर्वोत्तम संघ २०१८मध्ये होणाऱ्या विश्वचषक पात्रतेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. दरम्यान, गुआमविरुद्धच्या सामन्यानंतर भारत आणखी २ साखळी सामन्यांत खेळणार असून, एक सामना घरच्या मैदानावर तुर्कमेनिस्तानविरुद्ध रंगेल, तर दुसरा सामना विदेशी मैदानावर बलाढ्य इराणविरुद्ध रंगणार आहे. (वृत्तसंस्था)
भारत पहिल्या विजयाचा प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2015 23:09 IST