पर्थ : पाक आणि द. आफ्रिकेला नमवीत ‘ब’ गटात वर्चस्व निर्माण करणाऱ्या गतविजेत्या टीम इंडियाला आज, शनिवारी विश्वचषकात कमकुवत मानल्या जाणाऱ्या संयुक्त अरब अमिरातवर (यूएई) विजयासह हॅट्ट्रिक नोंदविण्याची संधी असेल. भारताच्या विजयात फलंदाज व गोलंदाजांनी तोलामोलाचे प्रदर्शन केले. तिसऱ्या सामन्यात मात्र वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी खेळणार नाही. त्याच्या गुडघ्याला दुखापत आहे. तथापि, यूएईविरुद्ध फारसा फरक जाणवणार नाही. गटात अव्वल स्थानावर राहण्याचा निर्धार धोनी अँड कंपनीने केलेला दिसतो. असे झाल्यास उपांत्यपूर्व फेरीत ‘अ’ गटात चौथ्या स्थानावर राहणाऱ्या संघाविरुद्ध खेळायला मिळेल. यूएईविरुद्ध टीम इंडियाला आणखी एक मोठा विजय साजरा करण्याची संधी असेल. यामुळे धावांची सरासरी वाढणार आहे. विराट कोहलीने दोन सामन्यांत शतक आणि ४६ धावांसह शानदार पुनरागमन केले. शिखर धवनने पाकविरुद्ध अर्धशतक ठोकल्यानंतर द. आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या. अजिंक्य रहाणे आणि सुरेश रैना हेदेखील उत्तम फलंदाजी करीत आहेत. भारताचे सहापैकी चार फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. यूएईच्या अनुभवहीन गोलंदाजीसाठी ही चांगली बातमी नाही. यूएईचा कर्णधार मोहम्मद तौकिर हा ४३ वर्षे ४३ दिवसांच्या वयासह स्पर्धेत सर्वाधिक वयाचा दुसरा खेळाडू आहे. २००४ मध्ये डम्बुला येथे आशिया चषक खेळल्यापासून तो केवळ सात सामने खेळू शकला. खुर्रम खान ४३ वर्र्षे २५० दिवस वयाचा आहे. संघाचे तीन गोलंदाज असांका गुरुगे, मोहम्मद नाविद आणि अमजद जावेद हे दहा आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. धोनी, कोहली, रहाणे यांच्यासारख्यांच्या फलंदाजीपुढे त्यांची डाळ शिजणार नाही. दुसरीकडे भारताला मोठी धावसंख्या उभारून सरासरीत सुधारणा करता येईल. रोहित शर्मा यालादेखील सूर गवसल्यास तो मोठी खेळी करू शकतो. कर्णधार धोनी हादेखील मोठी खेळी करण्याच्या प्रतीक्षेत असेल. कमकुवत संघाविरुद्ध बेंच स्ट्रेंग्थ तपासण्याच्या प्रयत्नांत धोनी विजयी संयोजन बदलेल, ही शक्यता नाही. शमीऐवजी मात्र बिन्नी किंवा भुवनेश्वर यापैकी एकाला संधी दिली जाईल. वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्या लाईन आणि लेंग्थबद्दल संघ व्यवस्थापन चिंतेत आहे; पण तो वेगात मागे नाही. मोहित शर्मानेदेखील कामगिरीने प्रभावित केले. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी प्रभावी फिरकी मारा करीत कर्णधाराची चिंता कमी केली. अशा परिस्थितीत यूएईला भारतावर विजय नोंदविण्यासाठी एखाद्या चमत्काराचीच आशा करावी लागेल. (वृत्तसंस्था)
भारताला हॅट्ट्रिकची संधी
By admin | Updated: February 28, 2015 01:27 IST