लंडन : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भ्रष्टाचार होण्याबाबत कोणती विशेष गुप्त माहिती किंवा शक्यता नाही. परंतु, पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) दरम्यान भ्रष्टाचार केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या दोन खेळाडूंकडे पाहता, आम्ही याबाबत गाफील राहणार नाही, असा विश्वास भ्रष्टाचारविरोधी संस्थेचे (एसीयू) आयसीसी प्रमुख सर रॉनी फ्लॅनागन यांनी व्यक्त केला. एसीयू प्रमुख फ्लॅनागन यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, की ‘सध्या आम्हाला चॅम्पियन्स ट्रॉफीत होऊ शकणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही किंवा तसे काही होण्याही शक्यताही नाही. मात्र, तरीही आम्ही याविषयी गाफील राहणार नाही. दुबईत नुकताच झालेल्या पीएसएलमधील घटना आम्ही पाहिल्या असून आम्ही याबाबत अधिक सतर्क राहू.’ त्याचबरोबर, ‘खेळाडूंना अनेक प्रकारे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले जातात. तुम्ही असे काही करू शकता ज्याचा सामन्याच्या निकालावर कोणताही परिणाम होऊ शकत नाही आणि सहजतेने पैसा मिळतो. हे सर्व योजनात्मक असते. याद्वारेच ते खेळाडूंना आकर्षित करतात,’ अशी माहितीही फ्लॅनागन यांनी दिली. (वृत्तसंस्था)
आयसीसी भ्रष्टाचाराबाबत गाफील राहणार नाही
By admin | Updated: May 26, 2017 03:28 IST