मुंबई - जागतिक अजिंक्यपद (20 वर्षांखालील) स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून देणारी हिमा दास आणि विश्वविक्रमी भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्या कामगिरीवर पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. हिमा व नीरज यांच्यासह भारताच्या सात खेळाडू 8 व 9 सप्टेंबरला होणा-या काँटिनेंटल चषक स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. चेक प्रजासत्ताक येथील ओस्ट्राव्हा येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आशियाई अॅथलेटिक्स असोसिएशनने या स्पर्धेत आशिया-पॅसिफिक संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भारताच्या सात खेळाडूंची निवड केली. या स्पर्धेत प्रत्येक विभागीय असोसिएशनमधील क्रमावारीतील आघाडीच्या खेळाडूंना सहभाग घेण्याची संधी मिळते. आंतरराष्ट्रीय महासंघाच्या क्रमवारीनुसार नीरज (भालाफेक), मोहम्मद अनास ( 400 मी.), जिंसन जॉन्सन (800मी.) आणि अरपिंदर सिंग (तिहेरी उडी) यांनी पुरूष विभागात, तर महिलांमध्ये हिमा दास (400 मी.), पी. यू. चित्रा (1500मी.) आणि सुधा सिंग (3000 मी. स्टीपलचेस) यांनी स्थान पटकावले आहे.
हिमा व नीरज यांच्या शिरपेचात मानाचा तुरा, काँटिनेंटल चषक स्पर्धेसाठी निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 21:48 IST