रिओ : रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत आयर्लंडविरोधात विजय मिळवल्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघासमोर जर्मनीचे मोठे आव्हान असणार आहे. भारतीय संघ सोमवारी माजी आॅलिम्पिक विजेता जर्मनीविरोधात विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरेल.भारतीय संघाने हॉकी स्पर्धेत शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात आयर्लंडवर ३-२ ने विजय मिळवला. आॅलिम्पिकमध्ये अथेन्स २००४ च्या स्पर्धेनंतर भारतीय संघाने मिळवलेला हा पहिला विजय आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघ जर्मनीच्या विरोधात तिसऱ्या क्वार्टरपर्यंत ३-१ ने पुढे होता. मात्र, त्यानंतर बचाव फळीच्या चुकांमुळे भारतीय संघाला हा सामना बरोबरीत सोडवावा लागला. भारताप्रमाणेच जर्मनीनेही रियो स्पर्धेत आपल्या अभियानाची विजयी सुरुवात केली आहे. जर्मनीने कॅनडाला ६-२ असे पराभूत केले. जर्मनीचा फॉर्म पाहता भारतीय संघाला या सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल आणि आयर्लंडविरोधात केलेल्या चुकांमधून शिकावे लागणार आहे.भारतीय संघाचे प्रशिक्षक रोलेंट ओल्टमन्स आयर्लंड विरोधातील विजयानंतर म्हणाले होते की, जर्मनी विरोधातील सामन्यात भारत आपला सर्वोत्तम खेळ करेल. जर्मनी मजबूत संघ आहे. मात्र भारतीय खेळाडूंना गोल करण्याच्या संधी निर्माण कराव्या लागतील. आणि त्या संधीचे रूपांतर गोलमध्ये करावे लागेल. जर्मनीच्या विरोधात भारताची रणनीती वेगळी असेल. ’’भारताने जर्मनीच्या विरोधात अखेरचा सामना १९९६ मध्ये अटलांटा आॅलिम्पिकमध्ये ३-० ने जिंकला होता. त्यानंतर आमंत्रित देशांच्या मालिकेत जर्मनीने भारताचा ०-४ असा पराभव केला. सिडनी आणि अथेन्स आॅलिम्पिकमध्ये भारताचा जर्मनीसोबत सामना झाला नाही. तर लंडन २०१२ मध्ये भारताला जर्मनीने ५-२ असे पराभूत केले होते. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल.
भारतासमोर जर्मनीचे आव्हान
By admin | Updated: August 8, 2016 03:34 IST