नवी दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्सने काल दिल्ली डेअरडेव्हिल्स संघावर सहा गडी राखून विजय मिळविला. कर्णधार गौतम गंभीरने या विजयाचे श्रेय गोलंदाजांना दिले आहे. यजमान संघाला कमी धावसंख्येवर रोखल्यामुळे हा विजय साकारला, असे गंभीर म्हणाला.केकेआरच्या उमेश यादव (२/१८), पीयूष चावला (२/२७) आणि मोर्ने मोर्कल (२/३0) यांच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा डाव आठ बाद १४६ असा गुंडाळला गेला. सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गंभीर म्हणाला, ‘‘गेल्या वर्षीपेक्षा आजची विकेट वेगळी होती. ही खेळपट्टी कशी बदलेल याचा अंदाज लावणे कठीण होते. आम्ही येथे अनेक रणजी सामने खेळलो असलो तरी पिचचे स्वरूप हवामानावर बरेचसे अवलंबून असते. दिल्लीला हरविणे सोपे नव्हते, हा एक महत्त्चाचा सामना होता, कारण त्यांच्याकडे युवराजसिंग आणि अँजेलो मॅथ्यूज यांसारखे मॅचविनर खेळाडू आहेत. त्यामुळे आमचा मार्ग सोपा नव्हता.’’ गंभीर पुढे म्हणाला, ‘‘मी शेवटपर्यंत टिकून राहायचे ठरविले होते. विजयासाठी आघाडीफळीपैकी कोणीतर एकाने १७-१८ षटके टिकून खेळायचे अशी आमची रणनीती होती. त्यात मीच पुढाकार घेतला. कर्णधाराने आपली जबाबदारी पार पाडली तर, इतरांकडून अपेक्षा करू शकतो.’’
विजयाचे श्रेय गोलंदाजांना : गौतम गंभीर
By admin | Updated: April 22, 2015 03:09 IST