वॉशिंग्टन : आगामी अमेरिकन ओपनसाठी कसून तयारी करीत असलेल्या ब्रिटनचा अव्वल टेनिसपटू अॅण्डी मरे याला अनपेक्षित पराभवाचा जबर धक्का बसला आहे. पहिल्या हार्डकोर्ड सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेल्या मरेला एटीपी आणि डब्ल्यूटीए वॉशिंग्टन ओपनमध्ये त्याला रशियाच्या तेमुराज गाबाश्विली याने नमवले.तिसऱ्या सेटमध्ये मात्र गाबाश्विलीने अखेरपर्यंत विजयाचे प्रयत्न न सोडता मरेला अनपेक्षित धक्का देऊन स्पर्धेत खळबळ माजवली. विशेष म्हणजे १९९३ सालानंतर पहिल्यांदाच वॉशिंग्टन ओपनमध्ये अग्रमानांकित खेळाडू पहिल्याच सामन्यात पराभूत झाला. त्या वेळी इवान लेंडल याला पहिल्याच सामन्यात गाशा गुंडाळावा लागला होता.गाबाश्विलीसमोर दुसऱ्या फेरीमध्ये लिथुआनियाच्या रिकार्डास बर्नाकिसचे आव्हान असेल. त्याच वेळी दक्षिण आफ्रिकेच्या पाचव्या मानांकित केविन अँडरसनला देखील पहिल्याच फेरीमध्ये जर्मनीच्या अॅलेक्झँडर वेरेव विरुद्ध ६-२, ३-६, ४-६ असे पराभूत व्हावे लागले. महिलांच्या गटात आॅस्टे्रलियाची द्वितीय मानांकित सामंथा स्टिसुरने सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना अमेरिकेच्या इरिना फाल्कोनीला ६-१, ७-५ असे नमवून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. दरम्यान, गतविजेत्या स्वेतलाना कुजनेत्सोवाने पायाच्या दुखापतीमुळे माघार घेतली आणि यामुळे अमेरिकेच्या स्लोएने स्टिफेंसने अव्वल आठ खेळाडूंमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. (वृत्तसंस्था)
गाबाश्विलीकडून मरे पराभूत
By admin | Updated: August 6, 2015 23:00 IST