नवी दिल्ली : अनागोंदी कारभारामुळे आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीने (आयपीसी) भारतीय पॅरालिम्पिक समितीची (पीसीआय) मान्यता गोठविल्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्रालयानेदेखील पीसीआयला निलंबित करताच अपंग खेळाडूंचे भविष्य अधांतरी झाले आहे. दुसरीकडे, निलंबनावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या.पीसीआयचे नवे अंतरिम अध्यक्ष एन. नंदकिशोर यांनी क्रीडा मंत्रालयाकडून अशी कारवाई अपेक्षितच होती, या शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. गाझियाबाद येथे गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेदरम्यान खेळाडूंचे झालेले हाल लक्षात घेत, काल मंत्रालयाने पीसीआयवर निलंबनाचा बडगा उगारला. नंदकिशोर पुढे म्हणाले, ‘‘आंतरराष्ट्रीय संस्थेने मान्यता स्थगित केल्यानंतर मंत्रालयदेखील निलंबनाची कारवाई करेल, हे अपेक्षित होते. आमची आमसभा १७ मे रोजी होणार असून नवीन अध्यक्ष कोण, हे बैठकीत निश्चित होईल. आमच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होता यावे, यासाठी हे निलंबन मागे घेण्यासाठी पावले उचलली जातील.’’ दरम्यान, निलंबित अध्यक्ष राजेश तोमर व अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आंतरराष्ट्रीय संस्थने पीसीआयवर एका अस्थायी समितीची स्थापना करावी आणि कामकाज सुरळीत चालवावे, अशी मंत्रालयाची इच्छा आहे. निलंबनामुळे भारतीय खेळाडंूना जुलै महिन्यात आयोजित रियो पॅरालिम्पिकच्या पात्रता फेरीला तसेच दोहा येथे आॅक्टोबर महिन्यात आयोजित विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेला मुकावे लागेल. यावर नंदकिशोर यांचे मत असे, की ‘आम्ही आंतरराष्ट्रीय संस्थेला विनंती करून आमच्या खेळाडूंना सहभागी होण्याची परवानगी मागू.’ तोमर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आयपीसीने पीसीआयला अनिश्चित काळासाठी निलंबित करण्याची ही तिसरी वेळ आहे. (वृत्तसंस्था)
अपंग खेळाडूंचे भविष्य अधांतरी
By admin | Updated: April 24, 2015 00:26 IST