कोलंबो : आगामी विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेने कुमार संगकारासह श्रीलंकेच्या चार खेळाडूंना भारताविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांतून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. एसएलसीने (श्रीलंका क्रिकेट बोर्ड) भारत दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका संघातील धम्मिका प्रसाद, सूरज रणदीव, उपुल थरंगा आणि कुमार संगकारा यांना भारताविरुद्ध अखेरच्या दोन वन-डे सामन्यांसाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. या खेळाडूंचा रविवारी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वन-डे सामन्यानंतर संघात समावेश राहणार नाही. अखेरच्या दोन सामन्यांसाठी या खेळाडूंच्या स्थानी शमिंडा इरंगा, लाहिरू थिरिमाने, दिनेश चांडीमल आणि अजंता मेंडिस यांचा समावेश करण्यात आले. संघातून वगळण्यात आलेल्या चार खेळाडूंपैकी केवळ संगकारा व प्रसाद यांना विश्रांती देण्यात आलेली आहे. संघाचे व्यवस्थापक मायकल डी जोएसा म्हणाले,‘थिरिमाने व चांडीमल यांनी अलीकडे वेस्ट इंडीज ‘अ’ संघाविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. थिरिमानने चार डावांमध्ये तीन अर्धशतके झळकाविली होती तर चांदीमलने दोनदा अर्धशतकाची वेस ओलांडली होती. संगकाराच्या अनुपस्थितीत उर्वरित सामन्यांसाठी चांदीमल व कुशाल परेरा महत्त्वाचे खेळाडू राहणार आहेत. भारताविरुद्धच्या मालिकेत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या श्रीलंका संघाला इरंगाच्या समावेशानंतर गोलंदाजीची बाजू मजबूत होईल, अशी अशा आहे. इरंगाने जुलै २०१३ पासून राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले नाही. या व्यतिरिक्त आयसीसी वन-डे टीम आॅफ इयरमध्ये समावेश करण्यात आल्यानंतर मेंडिसला भारतात येण्याची संधी देण्यात आली. (वृत्तसंस्था)
श्रीलंकेच्या चार खेळाडूंना विश्रांती
By admin | Updated: November 9, 2014 23:15 IST