पुणे : क्रिकेट... हॉकी... असे खेळ सोडून केवळ वेगळा (देशात काहीसा अप्रसिद्ध असलेला) खेळ म्हणून वडिलांनी टेनिस खेळायला प्रोत्साहित केले. घरात खेळाचे वातावरण म्हणायला आई कबड्डी खेळाडू ... वडील पेशाने शिक्षक... अशा वातावरणात वाढलेला दिल्लीचा सुमित नागल टेनिस खेळू लागतो... त्यानंतर थेट टेनिसची पंढरी समजल्या जाणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेत मुलांच्या दुहेरीचे जेतेपद पटकावून स्वप्नवत कामगिरी करतो. असे असले तरी मला एकेरीतच स्वत:चे स्थान मिळवायचे असल्याचे सांगत काहीसा धक्काही दोतो..हरियाणातील झज्जर येथे १६ आॅगस्ट १९९७ रोजी सुमित नागल याचा जन्म झाला. वडिलांच्या प्रोत्साहनानेच टेनिस खेळण्यास सुरुवात करणाऱ्या नागल याच्याकडे भारताच्या टेनिसचे आशास्थान म्हणून पाहिले जात आहे. विम्बल्डन २०१५ स्पर्धेत ज्युनिअर गटात व्हिएतनामच्या नाम होआंग याच्या साथीत त्याने ग्रॅण्डस्लॅम किताब नावावर करीत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. महाराष्ट्र लॉन टेनिस संघटनेतर्फे आयोजित (एमएसएलटीए) एटीपी चॅलेंजर स्पर्धेसाठी भारताचा हा युवा टेनिसपटू पुण्यात आला आहे. त्यानिमित्त या विम्बलडनवीराशी लोकमत प्रतिनिधीने संवाद साधला. या वेळी त्याने सरळ सेटमध्ये विजय मिळवावा तशा सहज गप्पांच्या माध्यमातून आपल्या खेळाची सुरुवात कथन केली. सुमित म्हणाला, ‘‘दिल्लीला राहत्या घरापासून जवळच एक टेनिस अॅकॅडमी होती. तेथे वयाच्या आठव्या वर्षांपासून टेनिस खेळायला सुरुवात केली. एक वेगळा खेळ म्हणूनच वडिलांनी टेनिस अॅकॅडमीत पाठविले. मी फक्त खेळत होतो. दरम्यान, महेश भूपती याने टेनिस खेळातील गुणवान खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या मिशन-२०१८ ला माझी निवड झाली. या मिशनसाठी १५ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. त्यातील मी एक आहे. या मोहिमेंतर्गत मी बंगळुरूला गेलो. त्यानंतरच माझ्या खेळाला वेगळी गती मिळाली.’’ परदेशी प्रशिक्षकाची नेमणूक, खेळाच्या साहित्यखरेदीसाठी लागणारा अमाप पैसा याविषयी विचारले असता भूपती यांच्या मिशनमुळे मला हा भार उचलावा लागला नाही, असे उत्तर सुमितने दिले. तसेच त्यांच्याच मार्गदर्शनाखाली माझा पुढील प्रवास सुरू आहे. सध्या जर्र्मनीतील फ्रँकफर्ट येथे तो प्रशिक्षण घेत आहे. तेथे एकेरीवर भर देत आहे. दररोज तीन तासांचे टेनिस व २ तासांचे फिजिकल ट्रेनिंग असा माझा रोजचा दिनक्रम तेथे सुरू असतो. आता लवकरात लवकर मी पुन्हा जर्मनीला प्रशिक्षणासाठी जाणार आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
एकेरीवरच जास्त लक्ष केंद्रित करणार
By admin | Updated: October 28, 2015 22:17 IST