रोहित नाईक, मुंबईमुंबई : अंधेरी येथील शहाजी राजे क्रीडा संकुलामध्ये (अंधेरी क्रीडा संकुल) आॅल इंडिया पिकलबॉल असोसिएशनच्या (आयपा) वतीने देशातील पहिला आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक पिकलबॉल कोर्ट तयार करण्यात आला आहे.लॉन टेनिस, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस या तीन खेळांचे मिश्रण असलेला हा खेळ भारतात प्रामुख्याने बॅडमिंटन कोर्टवर खेळला जातो. अंधेरी क्रीडा संकुलात मुंबई उपनगर पिकलबॉल असोसिएशनतर्फे प्रशिक्षण देण्यात येते.अंधेरी क्रीडा संकुलामध्ये यापूर्वी बॅडमिंटन कोर्टच्या उपलब्धतेनुसार शनिवार - रविवार असे दोन दिवस पिकलबॉल खेळला जात असे. या दोन्ही दिवशी बॅडमिंटन कोर्ट व्यस्त असल्याने खेळाडूंना बॅडमिंटन कोर्ट उपलब्ध होइपर्यंत वाट पाहावी लागायची किंवा काही वेळा सराव रद्द करावा लागायचा. मात्र आता स्वतंत्र कोर्ट तयार झाल्याने पिकलबॉलसाठी हक्काची जागा मिळाली आहे.२०७४४ आकाराचे हे कोर्ट तयार करण्यासाठी ‘आयपा’ला एकूण १ लाख १० हजार रुपयांचा खर्च आला. १५ दिवसांमध्ये तयार झालेल्या या कोर्टचे वैशिष्ट्य म्हणजे येथे चेंडूंचा अचूक अंदाज येतो. बॅडमिंटन कोर्टवरील लाकडी पट्ट्यांमुळे अनेकदा चेंडू टप्पा पडल्यावर स्विंग होतो. या कोर्टवर असा कोणताही अडथळा येत नाही. या कोर्टसाठी अंधेरी क्रीडा संकुलाने मोठी मदत केल्याचे मुंबई उपनगर पिकलबॉल असोसिएशनचा सचिव चेतन काते यांने सांगितले. संकुलाच्या कॅफेटेरीया परिसरातील मोकळी जागा आमच्या नजरेत आली. येथे कोर्ट तयार करणे शक्य असल्याने आम्ही संकुलाच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली आणि व्यवस्थापनाने त्वरीत सकारात्मक प्रतिसाद देत कोर्टसाठी परवानगी दिली, असे चेतनने सांगितले. कोर्टच्या देखभालीचा खर्च भरण्यासाठी आम्ही प्रत्येक खेळाडूकडुन अल्प शुल्क आकारणार असून त्यातील ४० टक्के रक्कम अंधेरी क्रीडा संकुलाकडे जमा करणार असल्याचे चेतन कातेने सांगितले.
मुंबईत साकारला देशातील पहिला सिंथेटिक पिकलबॉल कोर्ट
By admin | Updated: May 5, 2015 00:40 IST