ऑनलाइन लोकमतरांची, दि. २७ : फिनिशरचे काम सर्वांत कठीण असून तळाच्या स्थानावर खेळून चांगल्या फलंदाजीद्वारे संघाला विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूचा शोध देखील त्याहून कठीण असल्याचे मत टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानेचौथ्या वन डेत पराभव झाल्यानंतर व्यक्त केले. पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला, अशाप्रकारच्या खेळपट्टीवर तळाच्यास्थानावर फलंदाजी करणे कठीण काम आहे. स्ट्रईक रोटेट करीत भागीदारी रचण्याचे दडपण असते. पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर धावा काढून सामना जिंकून देणारा फलंदाज नेहमी मिळत नाही.
मधल्या फळीत अनुभवहीन फलंदाज असताना संयम पाळण्याची विनंती करीत धोनी पुढे म्हणाला, लक्ष्याचा पाठलाग करतेवेळी अशा खेळपट्टीवर संयम आवश्यक आहे. नव्या फलंदाजांना वेळ द्यावा लागेल. ते स्वत: मार्ग शोधून काढतील. दडपणाखाली सामने खेळता - खेळता हे फलंदाज लक्ष्याचा पाठलाग करणे शिकतील. खेळपट्टी मंद झाल्याने चेंडू थेट बॅटवर येत नव्हता. स्ट्राईक रोटेट करणे कठीण झाले होते.
सोढीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर विराट कोहलीने यष्टीमागे झेल दिला. कोहलीवर भारतीय संघ विसंबून आहे काय, असे विचारताच धोनी म्हणाला, असे मुळीच नाही. आकडेवारीवरून परिस्थितीची जाणीव होत नाही. भारताने गेल्या दीड महिन्यात फार वन डे खेळले नाहीत. स्वत: वेगवेगळ्या स्थानांवर फलंदाजी केली होती. न्यूझीलंडविरुद्ध खेळपट्टी मंद झाली होती. ही खेळपट्टी देखीलदिल्लीच्या खेळपट्टीसारखीच होती. त्यामुळेच धावांचा पाठलाग करणे आमच्यासाठी कठीण होऊन बसले.