पुणे : शालेय मुलांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी, यासाठी जी मुले आठवड्यातून चार दिवस नियमितपणे मैदानावर खेळतील त्यांना अतिरिक्त १० गुण दिले जाणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी केली.राज्य शासनाच्या वतीने ज्येष्ठ क्रीडापटू रमेश विपट आणि प्रा. गणपत माने यांना येथे तावडे यांच्या हस्ते शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. त्या वेळी त्यांनी ही घोषणा केली. मोबाइल आणि व्हिडीओ गेममुळे मुले मैदानांपासून दूर जात आहेत. त्यांना पुन्हा मैदानांकडे वळविण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे. मुलांनी रोज एक तास पतंग उडविला तरी हे गुण दिले जातील. यापुढे शाळांनाही मैदानी खेळांची सक्ती करण्यात येणार आहे. भविष्यात ज्या खेळाडूंना शासकीय सेवेत सरळ सेवा भरती केले जाईल, त्यांना महसूल, अर्थ अशा खात्यांमध्ये नोकरी न देता क्रीडा विभागातच नियुक्ती दिली जाणार आहे. कारण इतर विभागात या खेळाडूंना सरावासाठी काहीच वाव मिळत नाही. या खेळाडूंनी स्वत:सोबत दुसरे खेळाडू घडवावेत, अशी अपेक्षा असल्याचेही तावडे यांनी या वेळी नमूद केले. या कार्यक्रमात सन २०१२ आणि २०१३ च्या पुरस्कार विजेत्यांना गौरविण्यात आले. पालकमंत्री गिरीश बापट, आमदार मेधा कुलकर्णी, शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर, क्रीडा विभागाचे उपसचिव अविनाश साबळे, महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे आदी या वेळी उपस्थित होते.राज्याचा क्रीडा नकाशा तयार करणारराज्याच्या विविध भागात वेगवेगळे खेळ खेळले जातात. त्यामुळे राज्याचा क्रीडा नकाशाच बनविला जाणार आहे. यामुळे संबंधित भागात त्या खेळासाठी आवश्यक असलेल्या सुविधा, प्रशिक्षक उपलब्ध करून देणे शक्य होईल. शासनाने प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्णात क्रीडा संकुले उभारली आहेत. मात्र, त्यांची नियमित देखभाल दुरुस्ती होत नसल्याने ही संकुले दारूड्यांचे अड्डे बनली आहेत. या संकुलांच्या नियमित देखभालीसाठी केअरटेकर नेमण्यात येणार आहेत. यासाठी स्वतंत्र धोरणही तयार करण्यात येणार असल्याचे तावडे यांनी या वेळी सांगितले.
मैदानात खेळणाऱ्यांना जादा गुण
By admin | Updated: December 4, 2015 01:18 IST