मुंबई : भारताचा माजी कर्णधार व राजस्थान रॉयल्सचा मेंटर राहुल द्रविडने कुणाच्याही नावाचा उल्लेख न करता ‘चकिंंग’ करणाऱ्या खेळाडूंना इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेपासून दूर ठेवण्यासाठी बीसीसीआयने घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले. द्रविड म्हणाला,‘गोलंदाजी शैली संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या गोलंदाजांना स्पर्धेपासून दूर ठेवण्यासाठी बीसीसीआयने घेतलेली भूमिका योग्य असून त्यामुळे प्रशिक्षक सुरुवातीपासून गोलंदाजाची शैली योग्य कशी राहील याची खबरदारी घेतील. त्यामुळे गोलंदाजांना कारकीर्दीच्या सुरुवातीलाच शैलीमध्ये सुधारणा करता येईल.’ द्रविड पुढे म्हणाला,‘मी कुठल्या वैयक्तिक खेळाडूबाबत बोलणार नाही. पण, गोलंदाजी शैलीबाबत साशंकता असलेल्या गोलंदाजांना बाहेर करण्याचा बीसीसीआय व आयसीसीच्या निर्णयाचे समर्थन करतो.’ सुनील नरेनला आॅफ स्पिन चेंडू टाकण्यास बंदी घालण्यात आली असून त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर द्रविड बोलत होता. नरेन आयपीएलमध्ये केकेआर संघाचे प्रतिनिधित्व करतो. द्रविडने पुढे सांगितले की,‘मी अनेक कारणांमुळे या बाबीचे समर्थन करतो. अनेकजण अशा गोलंदाजांना शिक्षा करण्याबाबत बोलतात, पण त्या फलंदाजांचे काय जे या गोलंदाजांना खेळतात आणि आपली कारकीर्द पणाला लावतात. काही गोलंदाजांची शैली योग्य असते पण त्यांना अशा गोलंदाजांमुळे संधी मिळत नाही. त्यानंतर त्यांना भविष्यात कधीच संधी मिळत नाही.’ याबाबत ज्युनिअर व शालेय पातळीवर खेळाडूंच्या प्रशिक्षकांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे, असेही द्रविड म्हणाला. भारतीय संघाच्या सल्लागारपदी नियुक्ती झाल्याबाबत प्रतिक्रिया देण्यास द्रविडने नकार दिला. बीसीसीआयने याबाबत अद्याप माझ्यासोबत अधिकृतपणे संपर्क साधला नसल्याचे द्रविडने स्पष्ट केले. द्रविड म्हणाला,‘मला याबाबत प्रसारमाध्यमामुळे कळले आहे. याबाबत अद्याप अधिकृृत माहिती नसल्यामुळी मी यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही.’ (वृत्तसंस्था)
चकिंगबाबत द्रविड बीसीसीआय सोबत
By admin | Updated: May 2, 2015 10:20 IST