ऑनलाइन लोकमतकराची, दि. २७ : क्वेटा शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने विदेशी संघांना पाकिस्तानमध्ये क्रि केट खेळण्यासाठी आमंत्रित न करण्याचा सल्ला पाकिस्तान क्रिकेट मंडळाला (पीसीबी) दिला आहे.
क्वेटा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ६२ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात १७० हून अधिक जण जखमी झाले. हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. श्रीलंका संघावर झालेल्या हल्ल्यानंतर एकही विदेशी संघ पाकिस्तानमध्ये क्रि केट खेळण्यासाठी आलेला नाही. अख्तरने याच कारणामुळे विदेशी संघांना निमंत्रण न देण्याचे आवाहनपीसीबीला केले.
तो म्हणाला, पाकिस्तानात सुरक्षेची स्थिती चांगली नसल्याने विदेशी संघांना बोलावू नका. येथील परिस्थिती पूर्णपणे शांत होत नाही, तोपर्यंत कोणालाही बोलाविण्याचा धोका पत्करू नये, असे मला वाटते. पाकिस्तानमध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय क्रि केट खेळले जाईल. पण, त्यासाठी काही वेळ लागेल, असा आशावाद शोएबने व्यक्त केला.