ऑनलाइन लोकमत
अकापुल्को, दि. 02 - ऑस्ट्रेलियन ओपननंतर पहिल्यांदा कोर्टवर उतरलेला जागतिक क्रमवारीतील दुसºया स्थानावरील खेळाडू सर्बियाचा नोवाक जकोविच याला एटीपी अकापुल्को टेनिस स्पर्धेत सलग दुसºया विजयासाठी बराच घाम गाळावा लागला.
स्पेनच्या राफेल नदालने मात्र सहज विजयाची नोंद करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. जोकोविचला पहिल्या विजयासाठी देखील बराच संघर्ष करावा लागला होता. दुस-या सामन्यात त्याला अर्जेंटिनाचा ज्युआन मार्टिन डेल पेट्रो याच्यावर तीन सेटपर्यंत चाललेल्या संघर्षात ४-६, ६-४, ६-४ असा विजय मिळाला. उपांत्यपूर्व लढतीत त्याला आॅस्ट्रेलियाचा निक किर्गियोस याच्याविरुद्ध खेळावे लागेल.
आॅस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात रॉजर फेडररकडून पराभूत झालेला नदालदेखील प्रथमच कोर्टवर उतरला. त्याने इटलीचा पाओलो लोरेझी याचा ६-१, ६-१ ने सरळ सेटमध्ये पराभव केला. नदालने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. त्याची पुढील लढत जपानचा योशिहितो निशियोका याच्याविरुद्ध होईल. क्रोएशियाचा तिसरा मानांकित मारिन सिलिच याने आपलाच सहकारी बोर्ना कोरिच याच्यावर ६-३, २-६, ६-३ ने विजयाची नोंद करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.