मुंबई : भारतीय पुरुष क्रिकेटर्सना श्रेणीनुसार देण्यात येणारा वार्षिक भत्ता या वर्षीपासून महिला क्रिकेटर्सनाही देण्यात येणार आहे. त्यानुसार अव्वल श्रेणीतील महिला खेळाडूला वर्षाला १५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. पुरुष संघात यंदा महेंद्रसिंह धोनी, विराट कोहलीबरोबर अजिंक्य रहाणेला देखील अव्वल श्रेणी मिळाली असल्याने या खेळाडूंना वर्षाला एक कोटी रुपये मिळणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) संघातील खेळाडूंशी श्रेणीनुसार वार्षिक करार केले जातात. त्या श्रेणीनुसार त्यांना ठरावीक वार्षिक रक्कम दिली जाते. यंदा महिला क्रिकेटर्सचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार त्यांना ‘ए’ व ‘बी’ अशी श्रेणी देण्यात आली आहे. ‘ए’ श्रेणीसाठी १५, तर ‘बी’ श्रेणीसाठी १० लाख रुपये वार्षिक रक्कम निर्धारित करण्यात आली आहे. दरम्यान पुरुष क्रिकेटर्स संघाची श्रेणी जाहीर करण्यात आली असून, भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणेची ‘बी’ श्रेणीतून ‘ए’ श्रेणीत बढती करण्यात आली आहे. फिरकी गोलंदाज हरभजन सिंह याला ‘सी’ श्रेणी मिळाली आहे. गेल्यावर्षी ३२ खेळाडूंशी करार करण्यात आला होता. यंदा ती संख्या २६ पर्यंत खाली आली आहे. (वृत्तसंस्था)वरिष्ठ पुरुष खेळाडू : ए श्रेणी : १ कोटी रुपये - महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, आर. आश्विन, अजिंक्य रहाणे. ग्रेड बी : ५० लाख रुपये : अंबाती रायडू, रोहित शर्मा, मुरली विजय, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, ईशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद शमी, सुरेश रैना. ग्रेड सी (२५ लाख रुपये) : अमित मिश्रा, अक्षर पटेल, स्टुअर्ट बिन्नी, वृद्धिमान साहा, मोहित शर्मा, वरुण आरोन, कर्ण शर्मा, रवींद्र जडेजा, लोकेश राहुल, धवल कुलकर्णी, हरभजन सिंह, श्रीनाथ अरविंद.वरिष्ठ महिला : ग्रेड ए : १५ लाख रुपये - मिताली राज, झूलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, एमडी तिरूष कामिनी. ग्रेड बी : १० लाख रुपये - स्मृती मंधाना, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, एकता बिश्त, वेदा कृष्णमूर्ती, निरंजना नागराजन, पूनम राऊत.
महिला क्रिकेटर्सना दिवाळी भेट
By admin | Updated: November 9, 2015 23:40 IST