संघातील सर्व खेळाडूंची कामगिरी चांगली होत असून, खेळाच्या प्रत्येक विभागात कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरत आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केली. भारतीय संघाने शनिवारी संयुक्त अरब अमिरात संघाचा पराभव करीत आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळल्या जात असलेल्या विश्वकप क्रिकेट स्पर्धेत विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली. यूएई संघाविरुद्ध विजय मिळविल्यानंतर प्रतिक्रिया देताना धोनी म्हणाला, ‘गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरत असून, खेळाच्या अन्य विभागावर याचा प्रभाव दिसत आहे. आमची फलंदाजी चांगली आहे. आज एक झेल सुटला असला तरी आमचे क्षेत्ररक्षणही दर्जेदार होत आहे. संघातील सर्वच खेळाडू आपली भूमिका चोख बजावत आहे. आम्ही सलग तीन सामन्यांत चांगली कामगिरी केलेली आहे. कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे.’ धोनीने गोलंदाजांची प्रशंसा केली. धोनी म्हणाला, ‘उपखंडाबाहेर काही सामने गमाविले. त्यावेळी मधल्या षटकांमध्ये आम्ही बळी घेण्यात अपयशी ठरत होतो. आमच्यासाठी ही चिंतेची बाब होती. आता नव्या चेंडूने विकेट घेण्यात यशस्वी ठरत असून, फिरकीपटू मधल्या षटकांमध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजविण्यास सक्षम आहेत.’ यूएईविरुद्धच्या लढतीबाबत बोलताना धोनी म्हणाला, ‘आम्ही योजनाबद्ध खेळ केला. आम्ही प्रतिस्पर्धी संघाला धावा फटकाविण्याची संधी दिली नाही. पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वरने या सामन्यात चांगला मारा केला. अधिक सामने खेळल्यानंतर तो डेथ ओव्हर्समध्ये कशी गोलंदाजी करतो, याची कल्पना येईल.’
संघाच्या कामगिरीवर धोनी खूश
By admin | Updated: March 1, 2015 01:10 IST