नवी दिल्ली : महेंद्रसिंह धोनी आता पूर्वीसारखा खेळाडू राहिलेला नाही आणि त्याने आपल्या सहकाऱ्यांसमोर आदर्श ठेवताना फलंदाजी फळीत वरच्या क्रमांकावर आले पाहिजे, असे मत भारतीय कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याने व्यक्त केले.फिरोजशाह कोटला मैदानावर दिल्लीच्या रणजी करंडकाच्या सामन्यादरम्यान येथे आलेल्या अझहरुद्दीने म्हटले, ‘‘धोनी कर्णधार आहे आणि त्याच्यावर खूप दबाव असतो. जर तो चांगली कामगिरी करीत नसेल, तर निवड समितीला त्याच्याविषयी विचार करायला हवा. तो आता पूर्वीसारखा खेळाडू राहिलेला नाही. आपला ठसा उमटवण्यासाठी त्याने वरच्या फळीत फलंदाजी करायला हवी.’’ भारत-दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच्या १५० धावांच्या खेळीनंतरही ५ धावांनी पराभूत झाला. एवढेच नव्हे, तर धोनीदेखील संघाला विजयी लक्ष्य गाठून देण्यात अपयशी ठरला. भारताकडून ९९ कसोटी आणि ३३४ वनडे सामने खेळणाऱ्या अझहरुद्दीनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्वेंटी-२० मालिकेतील पराभवादरम्यान अजिंक्य रहाणेला संधी न देण्याच्या संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर टीका केली, तसेच अजिंक्य रहाणे हा अंबाती रायुडूपेक्षा उजवा असल्याचेही सांगितले. तो म्हणाला, ‘‘रहाणेचे तंत्र आणि खेळात कोणतीही उणीव नाही. त्याला ट्वेंटी-२0 मालिकेत बाहेर बसावे लागले, ही दुर्दैवी बाब आहे. रायुडूचा मी सन्मान करतो. तो चांगला खेळाडू आहे; परंतु रहाणे निश्चितच त्याच्यापेक्षा जास्त चांगला आहे. जेव्हा त्याची निवड झाली तेव्हा भारताने मालिका गमावली होती. अंबाती रायुडूचा मी सन्मान करतो; परंतु अजिंक्य त्याच्या तुलनेत अधिक चांगला खेळाडू आहे. तुम्ही विराट कोहलीनंतर संघातील सर्वोत्तम फलंदाजाला बाहेर कसे बसवू शकता? रहाणे आक्रमक फलंदाज आहे आणि त्याच्याजवळ सर्वच प्रकारचे फटके आहेत. त्याला फलंदाजीच्या वरच्या फळीत खेळवायला हवे.’’ (वृत्तसंस्था)
धोनी पूर्वीसारखा खेळाडू राहिला नाही : अझहरुद्दीन
By admin | Updated: October 11, 2015 23:58 IST