‘एआयबीए’चा यजमानपद काढून घेण्याचा निर्णय घाईचा - बीएफआय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 03:51 AM2020-04-30T03:51:50+5:302020-04-30T03:51:54+5:30

भारतीय मुष्टियुद्ध महासंघाने (बीएफआय) म्हटले की, ‘एआयबीएने घाईघाईमध्ये आपला निर्णय घेतला.’

Decision to remove AIBA host - Hastily - BFI | ‘एआयबीए’चा यजमानपद काढून घेण्याचा निर्णय घाईचा - बीएफआय

‘एआयबीए’चा यजमानपद काढून घेण्याचा निर्णय घाईचा - बीएफआय

Next

नवी दिल्ली : भारतामध्ये २०२१ साली पुरुषांची जागतिक अजिंक्यपद मुष्टियुद्ध स्पर्धा होणार होती. मात्र भारताच्या यजमानपदाचे हक्क आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटनेने (एआयबीए) काढून घेतले. यानंतर भारतीय मुष्टियुद्ध महासंघाने (बीएफआय) म्हटले की, ‘एआयबीएने घाईघाईमध्ये आपला निर्णय घेतला.’
‘एआयबीए’ने सोमवारी रात्री पत्रक जाहीर करत सांगितले की, ‘यजमानपदाचे शुल्क न भरल्याने आता ही अजिंक्यपद स्पर्धा भारताऐवजी सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथे आयोजित करण्यात येईल.’ २०१७ साली भारताला या स्पर्धेचे यजमानपद सोपविण्यात आले होते. ‘बीएफआय’ने शुल्क भरण्यास उशीर झाल्याचे मान्य केले आहे. त्याच वेळी पैसे कोणाच्या खात्यात भरायचे हा मुद्दा सोडवण्यात ‘एआयबीए’ला यश न आल्याने ही अडचण निर्माण झाली, असेही बीएफआयने स्पष्ट केले.
सुमारे ४० लाख डॉलरची रक्कम गेल्या वर्षी २ डिसेंबरला भरायची होती. भारतात पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन होणार होते. ‘एआयबीए’ने एका निवेदनात म्हटले की, ‘यजमान शहर करार नियमांनुसार भारताने यजमानपद शुल्क न भरल्याने ‘एआयबीए’ने हा करार मोडला. आता हा करार रद्द झाल्याने भारताला ५०० डॉलरचा दंड भरावा लागेल.’ आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीने आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ‘एआयबीए’ला निलंबित केले आहे.
‘बीएफआय’ने म्हटले आहे की, ‘लुसाने येथे ‘एआयबीए’चे खाते बंद करण्यात आले आहे. सर्बियामध्ये एका खात्याद्वारे त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करायचे होते. सर्बिया ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’च्या (एफटीएफ देश) काळ्या यादीमध्ये येत असल्याने भारतीय बँक तिथे पैसे पाठवत नाही. एआयबीए ही समस्या सोडवू शकले नाही. आमच्याशी चर्चा न करताच घाईमध्ये ‘एआयबीए’ने आपला निर्णय घेतला. आमच्यावर दंड लावण्यात आल्याचे आश्चर्य वाटते. या समस्येचा आपण मिळून तोडगा काढू आणि आशा आहे की, भविष्यात या स्पर्धेचे आम्ही यजमानपद सांभाळू.’ (वृत्तसंस्था)

Web Title: Decision to remove AIBA host - Hastily - BFI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.