मुंबई : फॉर्ममध्ये आलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला आयपीएल- ८ मध्ये रविवारी माजी विजेत्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन हात करायचे असून, ही लढत रोमहर्षक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.किंग्स पंजाबला शुक्रवारी ९ गड्यांनी नमविणाऱ्या दिल्लीने ८ पैकी ४ सामने जिंकून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सवर विजय रूसलेला दिसतो. गेल्या ५ पैकी एकाच सामन्यात ज्यांना विजय नोंदविता आला. १० सामन्यांपैकी २ सामने पावसात वाहून गेल्याने या संघाला एकेका गुणावर समाधान मानावे लागले होते. या संघाने सुरूवात चांगलीच केली होती. पहिल्या पाचही सामन्यात त्यांना विजय मिळाला होता. आकड्यांवर नजर टाकल्यास राजस्थानचे पारडे दिल्लीच्या तुलनेत जड वाटते. उभय संघांदरम्यान आतापर्यंत झालेल्या १५ सामन्यांपैकी राजस्थानने ९ तर दिल्लीने ६ सामने जिंकले. दोन्ही संघ १२ एप्रिलला परस्परांविरुद्ध खेळले होते. त्यात राजस्थानने सरशी साधली होती. आयपीएलच्या ७ व्या पर्वातही राजस्थानने दिल्लीचा दोनदा पराभव केला. त्यातील एक सामना ६२ धावांनी तर दुसरा सामना ७ गड्यांनी जिंकला होता. पण गेल्या ५ सामन्यांत पराभवाचे तोंड पाहिल्यानंतर राजस्थान सध्या दडपणाखाली आहे. दिल्लीला दिलासा देणारी बाब अशी की, झहीर खान संघात परतला आहे. पंजाबविरुद्ध काल त्याने १७ धावांत २ गडी बाद केले. याशिवाय कर्णधार जेपी ड्युमिनी आणि नाथन कोल्टर नाइल हे देखील उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. फिरकीपटू इम्रान ताहिरने ८ सामन्यांत १३ बळी घेत सध्याच्या पर्वात दुसऱ्या तसेच नाइल १० गडी बाद करीत पाचव्या स्थानावर आहे. ड्युमिनीने ८, अमित मिश्रा ७ तसेच अँजेलो मॅथ्यूजने ७ सामन्यांत ५ गडी बाद केले. ड्युमिनीचा अपवाद वगळता कुणीही अष्टपैलूत्व सिद्ध केलेले नाही. १६ कोटी रुपये खर्चून खरेदी करण्यात आलेला युवराज ‘आऊट आॅफ फॉर्म’ आहे. तो फलंदाजीत ढेपळलाच शिवाय ७ सामन्यांत एकही गडी बाद करू शकला नाही. राजस्थान गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर असला तरी मागच्या सामन्यातील अपयशामुळे चिंताग्रस्त आहे. मुंबई आणि बेंगळुरूकडून या संघाचा काठावर झालेला पराभव व्यवस्थापनाच्या चांगलाच जिव्हारी लागला. हा संघ संतुलित आहे आणि अन्य संघाच्या तुलनेत सांघिक कामगिरीत आघाडीवर आहे. पण नशिबाची साथ मिळताना दिसत नाही. शेन वॉटसन, स्टिव्हन स्मिथ, अजिंक्य रहाणे, दीपक हुडा, संजू सॅमसन यांनी फलंदाजीत आतापर्यंत समाधानकारक कामगिरी केली. (वृत्तसंस्था)
डेअरडेव्हिल्स-रॉयल्स लढत रोमहर्षक होणार
By admin | Updated: May 2, 2015 23:57 IST