नागपूर कसोटीचा पहिल्या दिवसाचा खेळ बघितल्यानंतर मला माझ्या कौंटी क्रिकेटच्या दिवसांची आठवण झाली. पूर्वीचे कसोटी व कौंटी क्रिकेट बोर्ड (टीसीसीबी) आणि आताचे इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) खेळपट्टी जर दर्जेदार नसेल तर गुणाची कपात करीत असे. माझ्या मते आयसीसीनेही तशीच भूमिका बजावायला हवी. जगभरात कसोटी क्रिकेटसाठी खेळपट्ट्या जर दर्जेदार नसतील तर गुणाची कपात करण्याचा निकष लावायला हवा. त्याचा प्रभाव मानांकनावरही होईल. नागपूरची खेळपट्टी पहिल्याच दिवशी आखाडा झाल्याचे चित्र आहे. चेंडू बॅटवर येण्यास अडचण भासत होती. यजमान संघाला अनुकूल खेळपट्ट्या असणे, याला माझे समर्थन आहे; पण आज जे काही बघितले त्याचे समर्थन करू शकत नाही. चेंडू खूप वळत होता आणि बॅटवर येण्यापूर्वी थबकत होता, हे चांगले लक्षण नाही. ज्यावेळी भारतीय सलामीवीर फलंदाजीसाठी आले त्यावेळी खेळपट्टीची माती त्यांच्या बुटांना चिकटत असल्याचे दिसत होते. जर अशा खेळपट्ट्या तयार करीत असाल तर भारताने वेगवान गोलंदाजांची उणीव असल्याची तक्रार करायला नको. भारताचे दोन वेगवान गोलंदाज उमेश व वरुण राखीव खेळाडूंमध्ये बसलेले आहेत. विदेशात हिरवळ असलेल्या खेळपट्ट्यांवर भारतीय गोलंदाज व फलंदाजांच्या तंत्राची चाचणी होते.केवळ खेळपट्टीचा विचार न करता मोर्न मोर्कलचा स्पेल सुखावणारा होता. त्याचा स्पेल बघणे आनंददायी होते. मी त्याने टाकलेला प्रत्येक चेंडू बघितला. पहिल्या दिवसाचा त्याचा स्पेल बघितल्यानंतर त्याने नक्कीच वरची पातळी गाठली आहे. तो खोलवर टप्पा देताना चेंडूची लकाकी लपवत चेंडू रिव्हर्स करीत होता; पण दक्षिण आफ्रिका संघाने ३० अतिरिक्त धावा दिल्या, असे माझे मत आहे. त्यांनी भारताच्या आघाडीच्या सहा फलंदाजांना माघारी परतविल्यानंतर डाव लवकर गुंडाळणे अपेक्षित होते. जडेजाने चांगली खेळी केली. रिव्हर्स होत असल्यामुळे चेंडूचा टप्पा पुढे राहील, याची त्याला कल्पना होती. तळाच्या फलंदाजांविरुद्ध आखूड टप्प्याचा मारा करायला पाहिजे, हे मोर्कलला लवकरच कळेल. जर त्याने आज याचा वापर केला असता तर जडेजासाठी फलंदाजी करणे सोपे ठरले नसते. माझ्या मते अशा प्रकारच्या खेळपट्टीवर २१५ धावा म्हणजे ३२५-३३० धावांच्या बरोबरीच्या आहेत. कसोटी पूर्ण पाच दिवस होईल, असे वाटत नाही.भारताकडे आघाडी असून, पाहुण्या संघाची भिस्त अमला व एबी डिव्हिलियर्सच्या कामगिरीवर अवलंबून आहे. हे दोन्ही फलंदाज अपयशी ठरले तर वर्चस्व भारताचेच राहील. (टीसीएम)
क्रिकेटची खेळपट्टी की कुस्तीचा आखाडा
By admin | Updated: November 25, 2015 23:37 IST