Chess: 5 Grand Master foreigners, including Samwell leading | बुध्दिबळ : सॅमवेलसह परदेशी ५ ग्रँड मास्टर आघाडीवर
बुध्दिबळ : सॅमवेलसह परदेशी ५ ग्रँड मास्टर आघाडीवर

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना व व्हिनस चेस अकादमी आयोजित मुंबई महापौर चषक आंतरराष्ट्रीय अ विभाग बुद्धिबळस्पर्धेच्या सातव्या साखळी फेरी अखेर  ६ गुणांची नोंद करीत चौथा मानांकित आर्मेनियाचा ग्रँड मास्टर सॅमवेल तेर-सहक्यान (इलो २६११), दहावा मानांकित आर्मेनियाचा ग्रँड मास्टर पेट्रोस्यांन मॅनुएल (इलो २५७३), बारावा मानांकित जॉर्जियाचा ग्रँड मास्टर पैचाड्झे लका (इलो २५५७ ), तेरावा मानांकित ब्राझिलचा ग्रँड मास्टर अलेक्झांडर फियर (इलो २५४३), अठरावा मानांकित चिलीचा ग्रँड मास्टर रॉड्रिगो वास्केझ (इलो २४७६) यांनी प्रथम क्रमांकाची संयुक्त आघाडी घेतली आहे. प्रथम मानांकित व्हेनेझुएलाचा ग्रँडमास्टर ईतूरिझगा बोनेली (इलो २६३७), द्वितीय मानांकित ताजिकिस्तानचा ग्रँडमास्टर अमोनातोव फारूक (इलो २६२४), ४३ वा मानांकित पश्चिम बंगालचा फिडे मास्टर मित्रभ गुहा (इलो २३४१) यांच्यासह इतर परदेशी ५ बुध्दिबळपटू ५.५ गुणांसह द्वितीय क्रमांकाच्या संयुक्त आघाडीमध्ये आहेत.

 बृहन्मुंबई महानगरपालिका पुरस्कृत माउंट लिटेरा स्कुल इंटरनॅशनल संस्थेच्या सहकार्याने बीकेसी येथे सुरु असलेल्या अ विभाग बुध्दिबळ स्पर्धेमधील सातव्या साखळी फेरीत ग्रँड मास्टर सॅमवेल तेर-सहक्यान विरुद्ध ग्रँड मास्टर अमोनातोव फारूक यांच्यातील सामना प्रारंभी चुरशीचा झाला. पांढऱ्या मोहरानी खेळतांना सॅमवेलने प्रतिस्पर्ध्यावर इंग्लीश पध्द्तीने जोरदार आक्रमण केले. त्याला फारूकने सिसिलियन नजडोर्फ प्रकाराने प्रत्युत्तर दिले. सॅमवेलने २८ व्या चालीत आपल्या हत्तींच्या बदल्यात घोड्याचा बळी घेऊन एक पुढे जाणारे प्यादे मिळविले. पण नंतरच्या काही चालीतील चुकीच्या खेळीने फारूकला पुनरागमनाची संधी मिळाली. तसेच वेळेच्या अभावामुळेफारूकने चुकीच्या खेळी करत सॅमवेलला डावावर पकड मजबूत करण्याची संधी दिली. परंतु सॅमवेलला शेवट योग्य चाली रचून न करता आल्यामुळे अखेर डाव ४९ चालीमध्ये बरोबरीत सुटला.

दुसऱ्या पटावर तृतीय मानांकित जॉर्जियाचा ग्रँड मास्टर पँटसुलिया लेवनने (इलो २६१४) पांढऱ्या मोहरांनी खेळतांना डावाची सुरवात रेटी प्रकाराने केली. पण जसजसा डाव पुढे वाढत गेला तेव्हा त्याचा प्रतिस्पर्धी चौदावा मानांकित युक्रेनचा ग्रँड मास्टर तुखाईवने (इलो २५२७) स्वतःची परिस्थिती मजबूत करत राजावर आक्रमणाची जोरदार तयारी केली.  ४२ व्या चालीत झालेल्या हत्तीच्या बदल्यात वजीर मिळवत तुखाईवने डावात कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु लेवनने योग्य चाली करून ५५  व्या चालीत डाव बरोबरीमध्ये सोडवला.स्पर्धेत प्रथमच खेळणाऱ्या चिलीचा ग्रँड मास्टर रॉड्रिगोने तिसऱ्या पटावर सहाव्या मानांकित बेलारूसचा ग्रँड मास्टर अलेक्सन्ड्रोव अलेक्सेजचा (इलो २५८८) पराभव करत आपली वाटचाल पुढे चालू ठेवली. स्पॅनिश पद्धतीने सुरवात झालेला डावाच्या ३५ व्या चालीत घोड्याच्या चुकीच्या खेळीमुळे अलेक्सेजला आपल्या हत्तीचा बळी द्यावा लागला. शेवटच्या टप्प्यात रॉड्रिगोच्या जवळ असलेल्या अतिरिक्त  घोडा आणि २ प्यादी यांच्या जोरावर त्याने ७५ चालीत अलेक्सेजला शरणागती पत्करण्यास भाग पाडले.


Web Title: Chess: 5 Grand Master foreigners, including Samwell leading
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.