हैदराबाद : आयपीएल-८ चे अर्धे पर्व संपले तरी लय मिळविण्यात अपयशी ठरलेल्या सनराइजर्स हैदराबादपुढे शनिवारी चेन्नई सुपरकिंग्सचे खडतर आव्हान असेल. सनराइजर्सचे सात सामन्यात केवळ सहा गुण आहेत. तीन सामने जिंकणाऱ्या या संघाला उद्या विजय आवश्यक राहील. चेन्नई सुपरकिंग्स आठ सामन्यात १२ गुण घेत अव्वल स्थानावर आहे. या संघाने दोन सामने गमावले. उभय संघात ११ एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात चेन्नईने हैदराबादचा ४५ धावांनी पराभव केला होता. स्वत: चेन्नईला काल केकेआरकडून पराभवाचे तोंड पहावे लागले. हा पराभव विसरून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकविण्यास सीएसके इच्छुक आहे. चेन्नई संघात अनेक स्टार्स असून त्यात फलंदाजीत धोनी, मॅक्यूलम, ड्वेन स्मिथ, सुरेश रैना, फाफ डुप्लासिस, आणि ड्वेन ब्राव्हो यांचा समावेश आहे. गोलंदाजीत आशिष नेहरा, मोहित शर्मा, रवींद्र जडेजा, पवन नेगी हे चांगले खेळाडू आहेत. चेन्नईने आतापर्यंत सामूहिक कामगिरीच्या बळावर विजय साजरे केले. त्यामुळेच या संघाला धूळ चारायची झाल्यास प्रतिस्पर्धी संघाला प्रत्येक विभागात कामगिरीचा ठसा उमटवावा लागेल. सनराइजर्स संघ हैदराबादमध्ये पहिला सामना खेळणार आहे. मधल्या फळीतील चिवट फलंदाजांची उणीव ही संघासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन यांनी सलामीला अनेक सामन्यात चांगली सुरुवात करून दिली आहे. (वृत्तसंस्था)
सनराइजर्सपुढे चेन्नईचे खडतर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2015 10:20 IST