नवी दिल्ली : प्रोफेशनल बॉक्सिंगमध्ये विजयी घोडदौड करीत असलेला भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग आता डब्ल्यूबीओ आशियाई किताब पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. १६ जुलैला होणाऱ्या या लढतीत त्याला युरोपियन चॅम्पियन कॅरी होपविरुद्ध भिडावे लागेल. सोमवारीच विजेंदरच्या प्रतिस्पर्धी खेळाडूची घोषणा झाली.गतवर्षी व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण केलेल्या विजेंदरने पहिल्या लढतीपासून सलग ६ लढती जिंकल्या असून या सर्व लढती नॉकआऊटमध्ये जिंकल्या आहेत. त्याचवेळी दुसरीकडे त्याचा प्रतिस्पर्धी होपकडे ३० बाउटचा अनुभव असून ज्यात त्याने २३ लढती जिंकल्या आहेत. यापैकी केवळ २ लढती त्याने नॉकआऊटमध्ये जिंकल्या आहेत.वेल्समध्ये जन्मलेला होप आॅस्टे्रलियाला स्थायिक झाला असून त्याने डब्ल्यूबीसी मिडलवेट चॅम्पियनचा मानही मिळवला आहे. यानंतर त्याने सुपर मिडलवेट गटात लढण्यास सुरुवात केली. होपने या वेळी एका पत्रकार परिषदेत सांगितले, ‘‘विजेंदर भारतात सुपरस्टार आहे. मात्र माझ्यासाठी तो केवळ एक बॉक्सर आहे. तो गेल्या वर्षापासून प्रोफेशनल खेळत आहे, तर मी गेल्या १२ वर्षांपासून प्रोफेशनल खेळत आहे. माझ्याकडे दीर्घ अनुभव आहे. मला माहिती आहे, की प्रेक्षकांचा पाठिंबा विजेंदरला असेल. पण दबाव त्याच्यावर असेल. त्याला कठीण सराव करावा लागेल.’’त्याचप्रमाणे, ‘‘मी त्याच्या यशाविषयी खूप काही ऐकले आहे, परंतु ते सर्व हौशी खेळाडू म्हणून आहे. प्रोफेशनल सर्किटमध्ये मी खूप अनुभवी आहे. मी याआधी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी झेप घेतलेली आहे,’’ असेही होप म्हणाला. तर होपच्या प्रतिक्रियेनंतर विजेंदरने सांगितले, ‘‘येणारी वेळच सांगेल, की १६ जुलैला काय होणार. प्रतीक्षा करा आणि बघा.’’ (वृत्तसंस्था)>विजेंदरचा जुना मित्र असलेला भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याला या लढतीचे पहिले तिकीट देण्यात आले. या वेळी सेहवागने सांगितले, ‘‘क्रिकेटमध्येही आॅस्टे्रलियाला हरवण्यास खूप मजा येते. त्यामुळेच मला आशा आहे, की विजेंदर कॅरीला नक्की हरवेल.’’ दरम्यान, त्यागराज स्टेडियममध्ये होणाऱ्या या लढतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांना निमंत्रित केले आहे.
विजेंदर सिंगपुढे कॅरी होपचे आव्हान
By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST