मुंबई : दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कामगिरीत सातत्याचा अभाव असला, तरी संघाचा अष्टपैलू खेळाडू अँजेलो मॅथ्यूज याने त्याचा संघ मुसंडी मारून आयपीएल आठच्या प्लेआॅफमध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.मुंबई इंडियन्सविरुद्ध होणाऱ्या लढतीच्या उंबरठ्यावर मॅथ्यूज बोलत होता. तो म्हणाला, ‘‘आम्ही मुंबईविरुद्ध २३ एप्रिल रोजी दिल्लीत झालेल्या सामन्यात खूप चांगले खेळलो. आम्हाला मुंबईविरुद्ध उद्या वानखेडे स्टेडियमवर खेळण्याची आणखी एक संधी मिळत आहे. आम्हाला शर्यतीत कायम राहण्यासाठी विजयाची गरज आहे. स्पर्धेत अजूनही काहीही होऊ शकते.’’तो म्हणाला, ‘‘कोणासाठीही वाईट दिवस ठरू शकतो. उद्या मुंबईसाठी वाईट दिवस होऊ शकतो. आम्हाला आमच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करावे लागेल.’’ राजस्थानविरुद्ध येथे गेल्या लढतीत खराब क्षेत्ररक्षणावर मॅथ्यूज म्हणाला, ‘‘क्षेत्ररक्षणामुळे आम्ही सामना गमावला, असे मला वाटते. या स्पर्धेतील दिल्लीचे झालेले हे सर्वांत सुमार क्षेत्ररक्षण होते. आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली केली. आम्हाला लवकरच मुसंडी मारावी लागेल.’’ (वृत्तसंस्था)
अजूनही प्लेआॅफमध्ये स्थान मिळवू शकतो : अँजेलो मॅथ्यूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2015 00:56 IST